मुंबई : ‘झिम्मा’ (Jhimma) चित्रपटाच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘झिम्मा’च्या टिझरमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता शीर्षक गीताच्या प्रदर्शित होण्याने अधिकच वाढली आहे. कधी एकदा ‘झिम्मा’ चित्रपट पाहता येईल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. असे असतानाच ‘माझे गाव’ हे अतिशय वेगळ्या धाटणीचे गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले असून अपेक्षा दांडेकर यांनी हे गाणे गायले आहे.
‘कुठल्या नभाच्या पार आहे माझे गाव’ असे या गाण्याचे शब्द असून हे गाणे प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावते. हे गाणे ऐकताना आपले मन अतिशय शांत होते. विचारांचा वेग मंदावतो आणि ओठांवर मंद हास्य उमटते. ही या गाण्याची जादू आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ चित्रपट 19 नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
‘झिम्मा’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाविषयची उत्सुकता प्रचंड वाढली. ‘झिम्मा’ कधी चित्रपटगृहात येतोय, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या चित्रपटाचे शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. हे जबरदस्त गाणे द३एखिल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. “खेळू झिम्मा गं.…” हे या गाण्याचे बोल असून या मोन्टाज सॅान्गचे शब्द आणि चाल संगीतप्रेमींना थिरकवणारे आहे. ट्रेलरमध्येच या गाण्याची झलक आपण पाहिली आणि ऐकली आहे. हे उत्स्फुर्तदायी गाणे वेगवेगळ्या वयोगटातील मैत्रिणींच्या प्रवासातील मजामस्तीवर चित्रित करण्यात आले आहे.
त्यामुळे हे गाणे ऐकताना आपल्याला आपल्या सहलीची आणि मैत्रीची आठवण आल्यावाचून राहणार नाही. अमितराज यांनी या धमाल गाण्याला संगीत दिले असून वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, आरती केळकर, सुहास जोशी यांनी हे गाणे गायले आहे.
‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वेगवेगळ्या वयोगटाच्या आणि एकमेकींना पूर्णपणे अनोळखी असलेल्या स्त्रिया मनमुराद जगण्यासाठी काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत इंग्लंडला जातात आणि मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
जाता जाताही सत्कार्य करून गेला अभिनेता पुनीत राजकुमार, नेत्रदानामुळे 4 लोकांना मिळाली दृष्टी!