साहिरचा बंडखोरपणा आणि माडगुळकरांच्या शैलीचा मिलाफ; सिन्नरकर कसे घडले वाचा!
कवी, गीतकार हृदयनाथ सिन्नरकर यांनी केवळ मराठी आणि हिंदी गीते लिहिली नाहीत. तर त्यांनी उर्दूतही गीत लेखन केलं. त्यासाठी त्यांनी उर्दू भाषा अवगत करून घेतली होती. (lyricist hridaynath sinnarkar influenced by sahir ludhianvi)
मुंबई: कवी, गीतकार हृदयनाथ सिन्नरकर यांनी केवळ मराठी आणि हिंदी गीते लिहिली नाहीत. तर त्यांनी उर्दूतही गीत लेखन केलं. त्यासाठी त्यांनी उर्दू भाषा अवगत करून घेतली होती. गझलांच्या प्रांतातही त्यांनी मुशाफिरी केली. त्यांनी आपली स्वत:ची लिखाणाची शैली निर्माण केली. त्यासाठी त्यांनी प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांचा बंडखोरपणा घेतला आणि साहित्यिक ग. दी. माडळगुळकर यांची शैली घेतली. (lyricist hridaynath sinnarkar influenced by sahir ludhianvi)
या दोघांचा प्रभाव
विठ्ठलनाथ कांबळे यांच्यानंतर हृदयनाथ सिन्नरकर यांच्यावर प्रभाव पडला तो प्रसिद्ध ऊर्दू शायर साहीर लुधियानवी यांचा. साहिरची गीते मानवी जीवनाशी नाते सांगणारी आणि वास्तवावर भेदक भाष्य करणारी होती. त्यामुळे त्यांच्या गीतांवर आपण प्रभावित झालो, असं सिन्नरकरदादा सांगायचे. त्यामुळेच त्यांनी साहिरला गुरू मानलं आणि एकलव्यासारखं त्यांचं शिष्यत्व पत्करलं. साहिर बंडखोर असल्याने त्यांची गीते ऐकून मी लिहू लागलो. ग. दी. माडगुळकरांची शैली घेतली अन् माझ्यातला कवी आकाराला आला, असं दादा सांगायचे.
स्टेजवर कार्यक्रम करणं जमलं नाही
1980-82 च्या काळात दादांनी स्टेजवर जाहीर कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. पण त्यात ते फारसे रमले नाहीत. त्यांनी कवी म्हणूनच राहणे पसंत केले. त्यांनी किमान पाच एक हजार गाणी लिहिली आहेत. त्यात गीते, कविता आणि गझलांचा समावेश आहे.
अन् गझलेकडे वळले
23 सप्टेंबर 1956 रोजी त्यांचे गुरु विश्वनाथ कांबळे यांचं निधन झालं होतं. त्यांच्या गझलांचं बाड त्यांच्याकडे होतं. या गझला वाचूनच ते गझल लिहायला शिकले. गोविंद म्हशीलकरांपासून आनंद शिंदेंपर्यंत अनेक गायकांनी दादांची गाणी गायली. पण त्यांना ओळख मिळवून दिली ती गोविंद म्हशीलकरांनी गायलेल्या गाण्यांमुळेच.
तवदारी आले तुरु तुरु, पायी तुडविले लेकरू, बा, हे दीन वासरू, लागले हंबरू, घे जवळी नको दूर करू…
गोविंद म्हशीलकरांनी दादांचं हे नमन गीत गायल्यामुळेच सिन्नरकर दादांना प्रसिद्धी मिळाली.
सांभाळा मीराबाई आता मी जाते, सोपविते तुम्हा पोटचा गोळा, प्राणापलिकडे या सांभाळा…
दादांचं हे गाणं म्हशीलकर जेव्हा साभिनय गायचे तेव्हा समोर बसलेला प्रेक्षक ढसढसा रडायचा. दादांच्या शब्दांची ताकद आणि म्हशीलकरांचा आवाज व अदाकारी या दुग्धशर्करा योगाने महाराष्ट्राला अक्षरश: रडवलं होतं.
उर्दूची बाराखडी
मराठी आणि हिंदीप्रमाणेच दादांचं उर्दूवरही प्रभुत्व होतं. अब्दुल रहमान नाजा आणि मुबारक अली नाजा हे दोन्ही उर्दू कव्वाल दादांचे बालमित्र होते. सादीक हिंगणघाटी हाही त्यांचा मित्रं होता. या मित्रांच्या सानिध्यात राहून दादा उर्दू शिकले. शिवडी लेबर कॅम्पाच्या बाजुलाच पठाणाची वस्ती होती. त्यामुळे दादांवर उर्दूचे संस्कार झाले. दादांनी केवळ उर्दूची बाराखडी गिरवली नाही तर उर्दू साहित्याचा अभ्यास करून ते आत्मसातही केलं. त्यांना कुराणाची सखोल माहिती होती. त्यांनी पैगंबरसाहेबांवर अनेक पुस्तके लिहिली होती. त्यांची उर्दू गीते जाहिदा बेगम या त्यावेळच्या गायिकेने गायली होती. (साभार, आंबेडकरी कलावंत) (lyricist hridaynath sinnarkar influenced by sahir ludhianvi)
संबंधित बातम्या:
‘देवदास’चं गाणं डोक्यात बसलं अन् कवी म्हणून उदय झाला; वाचा हृदयनाथ सिन्नरकरांचा किस्सा
किरण सोनावणे : गाणं आणि धर्मकारणाचा पूल सांधणारा गायक!
(lyricist hridaynath sinnarkar influenced by sahir ludhianvi)