Single Movie : अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब यांच्या ‘सिंगल’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात
'सिंगल' चित्रपटात प्रथमेश, अभिनय आणि प्राजक्ता या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. नुकतेच निर्माते किरण कुमावत आणि हर्षवर्धन गायकवाड यांच्या सिंगल या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात आलं आहे.
मुंबई : अभिनेता प्रथमेश परब (Prathmesh Parab) आणि अभिनय बेर्डे (Abhinay Berde) ही जोडी पहिल्यांदाच एका धमाकेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या जोडीसह प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) ही आगळ्या-वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आजवर प्रथमेशच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले तर अभिनयच्या चित्रपटालाही प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शविली. एकत्र कधीही काम न केलेली ही तरुण कलाकारांची टीम लवकरच एका चित्रपटातून समोर येणार आहे. ‘सिंगल’ असे चित्रपटाचे नाव असून प्रथमेश, अभिनय आणि प्राजक्ता या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. नुकतेच निर्माते किरण कुमावत आणि हर्षवर्धन गायकवाड यांच्या सिंगल या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात आलं आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले असून, याबाबत बोलताना हर्षवर्धन गायकवाड म्हणाले की, “या चित्रपटाची उत्सुकता मला लागून राहिली होती. नुकतीच चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली असून हा कॉमेडी चित्रपट लवकरच प्रेक्षकांना हसवण्यास सज्ज करणार आहोत”
प्रथमेश परब, अभिनय बेर्डे, प्राजक्ता गायकवाड, अमोल कागणे ‘सिंगल’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून इतर कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. या चित्रपटाचा जॉनर कॉमेडी असल्याचे समोर आलं असून चित्रपटाची कथा ही महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांच्या जीवनावर आधारित आहे. आताची तरुण पिढी आणि त्यांचे विश्व याची धमाल मस्ती या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास लवकरच सज्ज होत आहे.
दिग्दर्शक चेतन चवडा, सागर पाठक दिग्दर्शित हा चित्रपट निर्माते किरण कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक आणि सह-निर्माते सुमित कदम निर्मित असून हास्यकल्लोळ सादर करण्यास ते सज्ज झाले आहेत. प्रथमेश आणि अभिनय, प्राजक्ता, अमोल व्यतिरिक्त या चित्रपटात आणखी कोणते कलाकार कल्ला करणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.सिंगल हा चित्रपट आणि चित्रपटातील कलाकार कितपत हास्याच्या जोरावर प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.
संबंधित बातम्या