‘आश्रय’ चित्रपटातील ‘सतरंगी…’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, होळीगीत वाढवणार धुलिवंदनाचा उत्साह
उत्कंठावर्धक पहिलं पोस्टर रिलीज केल्यानंतर 'आश्रय'च्या निर्मात्यांनी आता या चित्रपटातील होळीगीत प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे.श्वेता पगार आणि अमेय बर्वे यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं आहे.
मुंबई : केवळ समाजात घडणाऱ्या घटनांचं नाही, तर मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांचं प्रतिबिंबही सिनेमाच्या (Cinema) निमित्तानं 70 एमएमच्या पडद्यावर उमटत असल्याचं आपण नेहमी पहात आलो आहोत. कथेच्या प्रवाहाशी एकरूप होणाऱ्या सणांचं औचित्य साधत लेखक-दिग्दर्शक एखाद्या गाण्याचा समावेश करतो यापैकी एखादं गाणं इतकं पॅाप्युलर होतं की संगीतप्रेमींच्या मनात कायमचं अजरामर होतं. असंच एक गीत ‘आश्रय‘ (Ashray) या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. उत्कंठावर्धक पहिलं पोस्टर रिलीज केल्यानंतर ‘आश्रय’च्या निर्मात्यांनी आता या चित्रपटातील होळीगीत प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. श्वेता पगार (Shweta Pagar) आणि अमेय बर्वे (Amey Barve) यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं कथानकात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारं असल्याचं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे.
संकल्प मोशन फिल्म्स प्रस्तुत आणि अभिषेक संजय फडे निर्मित ‘आश्रय’ या चित्रपटाचं रमेश पोपट ननावरे आणि संतोष साहेबराव कापसे यांनी केलं आहे. होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यानं सर्वांना होळी आणि धुलीवंदनाचे वेध लागले आहेत. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानंतर येणारा होळीचा सण अबालवृद्धांना एकत्र आणण्याचं काम करतो. ‘आश्रय’ या चित्रपटातही असंच एक सर्वांना ताल धरायला लावणारं गाणं पहायला मिळणार आहे. ‘सतरंगी ही दुनिया सारी…’ असा मुखडा असलेलं हे गाणं गीतकार आरती फडे यांनी लिहिलं असून, आरती यांनीच आनंद शिंदे यांच्या साथीनं गायलंही आहे. या गाण्याला सुमधूर संगीत देण्याचं काम संगीतकार विशाल बोरूळकर यांनी केलं आहे. श्वेता पगार आणि अमेय बर्वे यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं कथानकात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारं असल्याचं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. केवळ होळीचं एखादं गाणं हवं या अट्टाहासापायी ‘सतरंगी ही दुनिया सारी…’ या गाण्याचा समावेश ‘आश्रय’मध्ये करण्यात आलेला नाही तर या गाण्यामागं एक पार्श्वभूमी असल्याचे मतही दिग्दर्शकांनी व्यक्त केलं आहे.
‘आश्रय’ या टायटलवरूनच या चित्रपटात काहीशी आशयघन गोष्ट पहायला मिळेल याचा अंदाज येतो. त्यानुसार या चित्रपटाच्या माध्यमातून एका अनाथ लहान जीवाची कथा सादर करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे. ‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे…’ हे आपण कायम ऐकत आलो आहोत. याच न्यायानुसार या अनाथ जीवाला कोण आश्रय देतो, कोण त्याचा आधार बनतो, कोण त्याच्यावर मायेची पाखर घालतं या प्रश्नांची उत्तरं ‘आश्रय’मध्ये मिळणार आहेत.
अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं कथानक, सुमधूर गीत-संगीत, दर्जेदार निर्मितीमूल्ये, कसदार अभिनय आणि सुरेख सादरीकरणाच्या माध्यमातून ‘आश्रय’च्या रूपात एका परिपूर्ण मनोरंजक चित्रपट देण्याचा प्रयत्न निर्माते-दिग्दर्शकांसह संपूर्ण टिमनं केला आहे. या चित्रपटाचं कथालेखन अभिषेक संजय फडे यांनी केलं आहे, तर पटकथा व संवादलेखन दीक्षित सरवदे यांचं आहे. या चित्रपटात श्वेता आणि अमेय यांच्या जोडीला निशिगंधा वाड, सुनील गोडबोले, दीपाली कुलकर्णी आदी कलाकार आहेत. सिनेमॅटोग्राफीचं काम डिओपी राजू देशमुख आणि प्रथमेश शिर्के यांनी, तर संकलनाचं प्रदीप पांचाळ यांनी केलं आहे. आनंद शिंदे आणि आरती यांच्याखेरीज ऋषिकेष रानडेनंही या चित्रपटासाठी गायन केलं आहे. पार्श्वसंगीत अजिंक्य जैन यांचं आहे. व्हीएफक्स आणि डीआय जयेश मलकापुरे, प्रोडक्शन कंट्रोलर विनायक ढेरेंगे आणि वेशभूषा अमृता सावंत पाटील यांनी केली आहे.
संबंधित बातम्या