‘झिम्मा’ची ऐतिहासिक शंभरी, मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा
झिम्मा या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी 100 दिवस पूर्ण केले आहेत आणि 15 व्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटाने अशी गौरवास्पद कामगिरी केली आहे.
आयेशा सय्यद, मुंबई : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला. चित्रपटसृष्टीलाही याचा मोठा फटका सहन करावा लागला. अद्यापही महाराष्ट्रात सिनेमागृहे केवळ 50 टक्के आसनक्षमतेने सुरू आहेत. असं असतानाही मराठी चित्रपटांना सध्या चांगले दिवस आले आहेत, असे म्हणायला हरकत नाही. याची सुरूवात करणारा धाडसी चित्रपट म्हणजे हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा’(Jhimma). या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी 100 दिवस पूर्ण केले आहेत आणि 15 व्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटाने अशी गौरवास्पद कामगिरी केली आहे. अतिशय कठीण काळात प्रेक्षकांना सिनेमागृहात आणून 15 करोडची कमाई करणारा हा ब्लॉकबस्टर चित्रपट अजूनही सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाला आहे.
View this post on Instagram
लॉकडाऊन नंतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला ‘झिम्मा’ हा पहिलाच मोठा धाडसी मराठी चित्रपट आहे. एवढ्या विक्रमी संख्येने ‘झिम्मा’ची जोरदार घौडदौड सुरु आहे. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ काही दिवसांपूर्वीच अॅमेझॅानवर प्रदर्शित झाला असे असतानाही चित्रपटगृहात जाऊन ‘झिम्मा’ पाहणारा प्रेक्षकवर्गही कायम आहे.
‘झिम्मा’या चित्रपटाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवण्यात आला आहे. ॲमेझॉन प्राईम वर भारतातील पहिल्या पाच चित्रपटांमध्ये स्थान मिळवण्याचा बहुमान ‘झिम्मा’ने पटकावला आहे. आजही झिम्मा सर्वत्र ट्रेंडिंग ठरतोय.
या रेकॉर्डब्रेक कामगिरीनंतर निर्मात्या क्षिती जोग म्हणतात, “लॉकडाऊननंतर मराठी चित्रपटांचे काय होणार, अशी नकारात्मक चर्चा सुरू असताना झिम्मा प्रदर्शित करण्याचे धाडस केले. आजही चित्रपटगृहांमध्ये ‘झिम्मा’ची यशस्वी घोडदौड सुरू असून शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. मुख्य बाब म्हणजे हा चित्रपट लॉकडाऊनच्या नंतर चित्रपटगृहांची दारे उघडणारा चित्रपट ठरला आहे. बॅालिवूड हॅालीवुडचे मोठे चित्रपट शर्यतीत असतानाही तीन महिन्यांहून आधिक काळ ‘झिम्मा’ने चित्रपटगृहांमध्ये टिकून राहणे नक्कीच अभिमानास्पद आहे. सोशल मिडीयावरही ‘झिम्मा’च्या लोकप्रियतेबद्दल अद्यापही चर्चा सुरु आहे. त्याबद्दल माझ्या संपुर्ण टिमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत.”
संबंधित बातम्या