ज्येष्ठ संगीतकार पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर!
मराठी आणि हिंदीमधील अजरामर गाण्यांना चाली देऊन संगीत जगतात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या पंडित ह्रदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांना यावर्षीचा ‘मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार’, तर सुप्रसिध्द गायिका कविता कृष्णमुर्ती (kavita Krishnamurthy) यांना सन 2021चा ‘मोहम्मद रफी पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज केली.
मुंबई : मराठी आणि हिंदीमधील अजरामर गाण्यांना चाली देऊन संगीत जगतात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या पंडित ह्रदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांना यावर्षीचा ‘मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार’, तर सुप्रसिध्द गायिका कविता कृष्णमुर्ती (kavita Krishnamurthy) यांना सन 2021चा ‘मोहम्मद रफी पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज केली.
भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या ‘स्पंदन’ या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे चौदावे वर्ष असून एक लाख रू. रोख, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, 51 हजार रू. रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.
कुटुंबाच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा
मोहम्मद रफी यांचे कुटुंबिय आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून, त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो. गेल्या तेरा वर्षात मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने उत्तरोत्तर या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढत गेली.
यावर्षी पंडित ह्रदयनाथ मंगेशकर आणि कविता कृष्णमुर्ती यांना मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर करताना आपल्याला आनंद होतो आहे, या दोघांचेही संगीत जगतात मोठे योगदान असून त्यांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली याबद्दल आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आनंद व्यक्त केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते पुरस्कार वितरण
वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे 24 डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावर्षी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे ‘फिर रफी’ या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण, सरिता राजेश हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन संदीप कोकीळ करणार आहेत. कोरोनाचे नियम पाळून नाट्यगृहाच्या पन्नास टक्के क्षमतेने रसिकांना प्रवेश दिले जाणार आहेत.
यापूर्वी संगीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, प्यारेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम, मरणोत्तर श्रीकांत ठाकरे, अशा विविध मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही यापुरस्काराने गौरविण्यात आले आहे.