नागराजचा नाळ 2 येतोय, पाहा कसा असेल नाळ 2
नागराज मंजुळे यांनी आज एक मोठी घोषणा केलीये. फॅन्ड्री आणि सैराटसारखे हीट चित्रपट नागराज मंजुळेनी यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिध्द आणि दरवेळी काहीतरी वेगळे घेऊन येणारे दिग्दर्शक अर्थात नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी आज एक मोठी घोषणा केलीये. फॅन्ड्री आणि सैराटसारखे हीट चित्रपट नागराज मंजुळेनी यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. नागराज मंजुळे यांचे जास्त करून चित्रपट (Movie) हे ग्रामीण भागाशी निगडीत असतात. अस्सल मराठी (Marathi) तडका त्यांच्या प्रत्येक चित्रपटात बघायला मिळतो. फॅन्ड्री चित्रपटातील गाणे जीव झाला येडापिसा हे इतक्या वर्षांनंतरही लोकांच्या तोंडात आहे. नागराज मंजुळेनी आज एक घोषणा करत चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. नागराज मंजुळे यांचा नाळ चित्रपट यापूर्वी हीट झालाय. नागराज मंजुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाची जादु दाखवण्यासाठी नाळ 2 मधून परत येतायत. नुकताच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नागराज मंजुळे यांनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीये.
नागराज मंजुळेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, गेल्या महिन्यात मला सुधाकरचा फोन आला आणि त्याने सांगितले की, नाळचा दुसरा भाग लिहिला आहे. त्यानंतर नाळचा दुसरा भाग होऊ शकतो यावर माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. पूर्ण भाग मी ऐकला आणि हे सर्व अनपेक्षितपणे घडत अवघ्या दोन महिन्यामध्ये चित्रपटाची पूर्ण तयारी करत झटक्यात शूटिंगही सुरू केले.
पुढे नागराज मंजुळे यांनी लिहिले की, नाळ प्रमाणेच नाळचा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे…नाळ 2 च्या नावाने चांगभलं…असे नागराज मंजुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणत नाळ 2 चित्रपटाचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. 2018 मध्ये नाळ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नाळला प्रेक्षकांचे खूप प्रेमही मिळाले होते. आता नाळ 2 काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.