मुंबई : ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ‘अज्या’ अर्थात अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavhan) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. डॅशिंग, कूल अंदाजाने तरुणींना घायाळ करणारा नितीश लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. त्याची ‘सोयरीक’ जुळली असून ती कोणासोबत जुळली आहे? या विषयीची जोरदार चर्चा सर्वत्र रंगली आहे.
‘सोयरीक’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून 14 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून नितीश मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
या मोशन पोस्टरमध्ये लग्नाचा माहोल दिसत असून, नितीश चव्हाणचा चेहरा दिसतोय. पाठमोरी उभी असलेली मुलगी कोण? हे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. आपल्या पदार्पणाबद्दल बोलताना नितीश सांगतो की, ‘सोयरीक’ हा अतिशय वेगळा विषय आहे आणि नामवंत कलाकारांसोबत काम करायला मिळाल्याचा आनंद या चित्रपटातून मिळाला आहे. दिग्दर्शक मकरंद माने यांनी नेहमीच वेगळे विषय हाताळले आहेत. ‘सोयरीक’ मध्येही ते नात्यांबद्दल मंथन घडवणार आहेत.
अभिनेता नितीश चव्हाण हा मुळचा साताऱ्याचा असून, तो उत्तम कोरिओग्राफर आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत ‘अज्या’ची भूमिका साकारून त्याने अफाट प्रसिद्धी मिळवली. या मालिकेत त्याने एका अशा मुलाची भूमिका साकारली होती, जो अनाथ असून त्याचे भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते. या स्वप्नाला उराशी बाळगून हवी ती मेहनत करायला हा अजय तयार होता. अथक प्रयत्नांनी तो सैन्यात भारती झाला आणि त्याने देश सेवा केली. इतकेच नाही तर, त्याने सोबतच्या अनेक मुलांना देखील देशसेवेसाठी प्रोत्साहित केले. या मालिकेचे कथानक आणि यातील पात्र सामान्य प्रेक्षकांच्या मनाला खूप भावले.
‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेला मकरंद माने लिखित-दिग्दर्शित ‘सोयरीक’ चित्रपटात नामवंत कलाकारांची मांदियाळी पहायला मिळणार आहे. विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी तर संकलन मोहित टाकळकर यांचे आहे. वैभव देशमुख यांच्या गीतांना विजय गवंडे यांचे संगीत आहे. अजय गोगावले यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन विट्ठल पाटील तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. वेशभूषा अनुतमा नायकवडी तर रंगभूषा संतोष डोंगरे यांनी केली आहे. सहाय्यक दिग्दर्शक अमोल घरत आहेत.