Dharmaveer: खरंतर ‘धर्मवीर’ आनंद दिघेंच्या भूमिकेसाठी प्रसाद ओकला पहिली पसंती नव्हती, पण….
अभिनेता प्रसाद ओकची (Prasad Oak) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. प्रसादने पडद्यावर हुबेहूब आनंद दिघे (Anand Dighe) साकारल्याने त्याला प्रेक्षकांची वाहवाही मिळतेय.
धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास सांगणारा ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) हा बहुचर्चित चित्रपट 13 मे रोजी थिएटर्समध्ये दाखल झाला. अभिनेता प्रसाद ओकची (Prasad Oak) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. प्रसादने पडद्यावर हुबेहूब आनंद दिघे (Anand Dighe) साकारल्याने त्याला प्रेक्षकांची वाहवाही मिळतेय. प्रवीण तरडेंनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. मात्र दिघेंच्या भूमिकेसाठी प्रसाद ओक हा पहिली पसंत नव्हता. त्याआधी तरडेंच्या मनात दुसऱ्या कलाकाराचा विचार होता. जेव्हा प्रवीण तरडेंनी प्रसादला दिघेंच्या लूकमध्ये पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा सर्वच बदलल्याचं त्यांनी सांगितलं. एका मुलाखतीत त्यांनी याविषयी सांगितलं.
“आनंद दिघे यांच्या आयुष्यावर चित्रपट करताना तो भव्य आणि खर्चिक व्हावा असा माझा विचार होता. कारण हा एक मोठ्या व्यक्तीचा जीवनपट आहे. आम्ही कास्टिंगवरही खूप मेहनत घेतली. अनेकांचे लूक टेस्ट घेतले. दिघेंच्या भूमिकेसाठी प्रसाद ओक हा माझ्या ध्यानीमनीही नव्हता. मी खरंतर दिग्दर्शक, लेखक विजू माने यांचा विचार करत होतो. कारण ते लहानपणापासून आनंद दिघेंच्या सानिध्यात राहिले. त्यांचा सहवास त्यांना मिळाला होता. दोघांची उंचीही सारखीच आहे. पण जेव्हा प्रसाद ओकला दिघेंच्या लूकमध्ये पाहिलं तेव्हा संपूर्ण चित्रच पालटलं”, असं प्रवीण तरडेंनी एका माध्यमाशी बोलताना सांगितली. चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये या अभिनेत्याने साकारली, तर अभिनेता क्षितिज दाते हा एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत आहे.
‘धर्मवीर’ या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जवळपास नऊ कोटींचा गल्ला जमवला आहे. वीकेंडला या चित्रपटाची चांगली कमाई झाली आहे. ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, पुणे आणि मुंबईतही विविध ठिकाणी हाऊसफुल गर्दी जमवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-
#Marathi film #Dharmaveer goes from strength to strength with each passing day… The day-wise growth is absolutely fantastic… Fri 2.05 cr, Sat 3.17 cr, Sun 3.86 cr. Total: ₹ 9.08 cr. pic.twitter.com/v8HBKesErX
— taran adarsh (@taran_adarsh) May 16, 2022
पहिल्या तीन दिवसांची कमाई-
शुक्रवार- 2.05 कोटी रुपये शनिवार- 3.17 कोटी रुपये रविवार- 3.86 कोटी रुपये एकूण- 9.08 कोटी रुपये