राजकुमार संतोषी कधीपासून तयार, मांजरेकरांचे वरातीमागून घोडे! प्रा. हरी नरके यांची ‘गोडसे’वर टीका
सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या आगामी ‘गोडसे’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर वादाला तोंड फुटले आहे. आता या वादावर प्रा. हरी नरके यांनी देखील भाष्य केले आहे.
मुंबई : सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या आगामी ‘गोडसे’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर वादाला तोंड फुटले आहे. आता या वादावर प्रा. हरी नरके यांनी देखील भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी महेश मांजरेकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. 2 ऑक्टोबरला मांजरेकर नामक कुणा फिल्ममेकरने आद्य दहशतवादी नथुराम गोडसेवरचा सिनेमा करण्याची घोषणा केली. त्यावर बऱ्याच प्रतिक्रियाही आल्या. खरं तर मांजरेकरांचे वरातीमागून घोडे निघणारेय. मांजरेकरांच्या आधीच चित्रपट तयार झालाय, असे हरी नरके म्हणाले.
‘निर्माते-दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी विरुद्ध गोडसे’ हा हिंदी चित्रपट केव्हाच तयार झालेला आहे. लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन लांबलेय. संतोषी हे भगतसिंग, घायल, लज्जा, दामिनी, खाकी, हल्ला बोल अशा बऱ्याच चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत’, असे देखील प्रा. हरी नरके म्हणाले.
त्यांच्या या चित्रपटाला मध्यप्रदेश भाजपा सरकारने पैसा पुरवलेला असल्याने तो कसा असेल याबद्दल कयास बांधता येतील. तेव्हा मांजरेकर त्याचा रिमेक करणार असतील, अशी टीका देखील प्रा हरी नरके यांनी केली.
गांधी जयंतीच्या दिवशी ‘गोडसे’ चित्रपटाची घोषणा
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152व्या जयंतीच्या मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी ‘गोडसे’ या चित्रपटाची घोषणा केली होती. मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमाच्या पोस्टरचा फोटो शेअर केला होता. यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, वाढदिवसाच्या सर्वात घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा!’ संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीनिमित्त “गोडसे” सिनेमाची घोषणा केली आहे.
महेश मांजरेकर काय म्हणाले?
नथुराम गोडसेची कथा नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहे. या स्वरुपाच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धैर्य लागते. माझा नेहमीच कठीण विषयांवर आणि बिनधास्त गोष्टींवर विश्वास आहे. सिनेमाचे हे कथानक अशाच पद्धतीचे आहे. महात्मा गांधींवर गोळीबार करणारी व्यक्ती ही ओळख वगळता त्यांच्याबद्दल कुणालाच जास्त माहिती नाही. त्यांची कथा सिनेमातून सांगताना, कुणालाही पाठिशी घातलेले नाही ना कुणाच्या विरोधात भाष्य केले आहे. योग्य काय अयोग्य काय आहे ते प्रेक्षकांवर आम्ही सोडले आहे, असे महेश मांजरेकर यांनी म्हटले.
View this post on Instagram
हेही वाचा :
Bigg Boss Marathi – 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली
अभिनेते महेश मांजरेकर यांच्यावर मारहाणीचा आरोप, अदखलपात्र गुन्हा दाखल