रंजना देशमुख यांच्या आई, ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं निधन
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख (Vatsala Deshmukh) यांचं शनिवारी (12 मार्च) दुपारी निधन झालं. वत्सला देशमुख या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांच्या आई होत्या.
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख (Vatsala Deshmukh) यांचं शनिवारी (12 मार्च) दुपारी निधन झालं. वत्सला देशमुख या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांच्या आई होत्या. वत्सला यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘तुफान और दिया’ या हिंदी चित्रपटातून केली. त्यांचे ‘फायर’, ‘नागपंचमी’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ असे अनेक चित्रपट गाजले होते. पण ‘सुहाग’ या चित्रपटातून त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्यांनी पिंजरा आणि नवरंग चित्रपटातसुद्धा काम केलं होतं. आई, मावशी, काकू, आजी अशा विविध भूमिकेतून त्या प्रेक्षकांसमोर आल्या. वत्सला यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत वत्सला यांना श्रद्धांजली वाहिली.
‘वत्सला देशमुख यांच्यासारख्या हरहुन्नरी अभिनेत्रींच्या जाण्याने चित्रपटक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली,’ अशा शब्दांत खोपकरांनी श्रद्धांजली वाहिली. वत्सला यांनी ‘पिंजरा’ या चित्रपटात ‘आक्का’ही थोड्याफार प्रमाणात खलनायिकेकडे झुकणारी भूमिका साकारली होती. ही भूमिका सोडली तर त्यांच्या अभिनय प्रवासात त्यांनी सकारात्मक भूमिकाच साकारल्या आहेत. प्रेक्षकांच्या मनावरही त्यांनी साकारलेल्या भूमिकांचा ठसा राहिलेला आहे.
वत्सला यांचे वडील श्रीधरपंत देशमुख हे बापुराव पेंढारकर यांच्या ललितकलादर्श कंपनीत होते. कंपनीच्या नाटकात ते लहानमोठ्या भूमिका करत असत. नाशिकहून मुंबईला आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला बरीचशी गुजराती नाटकेही केली होती. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ‘रणदुदुंभी’, ‘त्राटिका’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘बेबंदशाही’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ यांसारख्या नाटकांतून त्यांनी कामं केली. ‘शिर्डीचे साईबाबा’ हा मराठी आणि ‘शिर्डी के साईबाबा’ हिंदी हे त्यांचे सुरुवातीचे चित्रपट होते. पुढे त्यांनी हिंदीत ‘तुफान और दिया’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’, ‘नवरंग’, ‘लडकी सह्याद्री की’, ‘हिरा और पत्थर’ आणि मराठीत ‘वारणेचा वाघ’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘झुंज’, ‘पिंजरा’ हे चित्रपट केले.
हेही वाचा:
पाणीला पानी म्हणणारेही मराठी इंडस्ट्रीत, त्यांना पाहून राग अनावर होतो- उषा नाडकर्णी
‘काढण्यासारखं थोडं काही, वेचण्यासारखं खूप काही’; ‘झुंड’बाबत ‘धुरळा’च्या लेखकाची पोस्ट चर्चेत