मराठवाडा पेटलेला असतानाही समाजप्रबोधन; चळवळ्या गायक विष्णू शिंदे!
'माझी दहा भाषणं आणि शाहिराचं एक गाणं', असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जाहीर भाषणात सांगितलं. त्यानंतर दलित समाजातील गायकांमध्ये नवी ऊर्जा संचारली आणि त्यांनी आपली संपूर्ण गायनकला आंबेडकरी चळवळीला वाहिली. (singer turned activist, know about vishnu shinde)
मुंबई: ‘माझी दहा भाषणं आणि शाहिराचं एक गाणं’, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जाहीर भाषणात सांगितलं. त्यानंतर दलित समाजातील गायकांमध्ये नवी ऊर्जा संचारली आणि त्यांनी आपली संपूर्ण गायनकला आंबेडकरी चळवळीला वाहिली. प्रसिद्ध गायक विष्णू शिंदे हे त्यापैकी एक. विष्णू शिंदे यांनी ऊन, वारा, पाऊस एवढंच काय अगदी दंगलीची भितीही न बाळगता समाजप्रबोधनाचं कार्य सुरू ठेवलं. नामांतराच्या काळात मराठवाडा पेटलेला असताना जीव धोक्यात घालून शिंदे कार्यक्रम करत होते. त्याचाच घेतलेला हा आढावा. (singer turned activist, know about vishnu shinde)
मराठवाडा पेटलेला असतानाही दौरे
औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पेटले होते. ठिकठिकाणी मोर्चे निघत होते. बऱ्याच भागात दगडफेकीच्या घटनाही घडत होत्या. त्या तप्त वातावरणातही विष्णू शिंदे आपला लवाजमा घेऊन समाजप्रबोधनाची कार्यक्रम करत होते. गावखेड्यात फिरत होते. विशेषत: ते मराठवाड्यातच फिरत होते. 1985-88 मध्ये परभणीत प्रा. जोगेंद्र कवाडे यांची सभा होण्यापूर्वी आणि नांदेडमध्ये रामदास आठवले यांची सभा होण्यापूर्वी गाणे गात असताना शिंदे यांच्यावर दगडफेक झाली होती. त्याकाळात हा लवाजमा घेऊन फिरताना त्यांना प्रचंड असुरक्षित वाटायचे. पण बाबासाहेबांचे विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे, या विचाराने त्यांनी जीवाची पर्वा न करता कार्यक्रम सुरू ठेवले. ज्या गावात अन्याय अत्याचार झाला, त्याच गावात मुक्काम करायचा आणि रात्रभर समाजप्रबोधन करायचा असा शिरस्ता त्यांनी सुरू ठेवला. न भीता आम्ही ठरवूनच ही रणनीती अवलंबली होती, असं ते सांगतात.
मातब्बर गायकांनी गाणी गायली
शिंदे यांनी आतापर्यंत सात हजारांपेक्षा अधिक भीम-बुद्ध गीते गायली आहेत. दहा-बारा हजाराहून अधिक गीते त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या गाण्याच्या तीनशेच्यावर कॅसेट बाजारात आहेत. लक्ष्मण राजगुरू हे त्यांचे गायन क्षेत्रातले गुरू आहेत. त्यामुळे राजगुरू यांची गाणी सर्वाधिक गायली आहेत. त्यांनी उषा मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, जानी बाबू, अपर्णा मयेकर, शब्बीर कुमार, ज्योत्सना हार्डिकर, प्रिया मयेकर आणि अल्ताफ राजा यांना घेऊन बाबासाहेबांच्या गाण्याच्या कॅसेट काढल्या आहेत.
रिपब्लिकन ऐक्य सांधण्यासाठी धडपड
बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्षव उभा राहावा हे त्यांचं स्वप्न आहे. त्यांच्या गाण्यातूनही ही तळमळ सातत्याने व्यक्त होत असते. त्याच तळमळीतून त्यांनी दलित गायकांच्या सर्व छोट्यामोठ्या संघटना बरखास्त करून रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली ‘परिवर्तन कला महासंघा’ची स्थापना केली. स्वत: विष्णू शिंदे या संघटनेचे महासचिव आहेत. या संस्थेचे सुमारे 12 हजार कलावंत सदस्य असून ही सर्वात मोठी संघटना मानली जाते. याशिवाय रिपब्लिकन एकता कला मंचच्या माध्यमातूनही रिपब्लिकन पक्षातील दुफळी सांधण्याचं काम ते करत आहेत. कलावंतांच्या मदतीने उपोषणे, मोर्चे, आंदोलन करून त्यांनी रिपब्लिकन ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला.
गीतच नव्हे कविता लेखनही
शिंदे यांनी सुरुवातीच्या काळात कविता लेखनही केले होते. त्यांचा ‘संघर्ष’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली आहे. त्यांची ‘मनोरंजन गीते’, ‘राजकमल गीते’, ‘जयभीम गीतमाला’ या गीतांच्या छोट्या-छोट्या 60-70 पुस्तिकाही प्रसिद्ध आहेत. ते हार्मोनियम विशारद आणि उत्कृष्ट तबला वादकही आहेत. त्यांचा मुलगा विश्वजीत आणि मुलगी विद्या यांनी शिंदे घराण्याची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. त्यांचा गाण्याचा अल्बमही बाजारात आला आहे. (साभार: आंबेडकरी कलावंत) (singer turned activist, know about vishnu shinde)
संबंधित बातम्या:
आजोबा-पणजोबा पोतराज, वडील चरित्र गायक, नोकरीचा कॉल फाडला; वाचा, विष्णू शिंदेंची कहाणी
पँथर ते बसपा… कार्यकर्ताही आणि कवी, गीतकारही…; असे होते हृदयनाथ सिन्नरकर
साहिरचा बंडखोरपणा आणि माडगुळकरांच्या शैलीचा मिलाफ; सिन्नरकर कसे घडले वाचा!
(singer turned activist, know about vishnu shinde)