मुंबई : जिच्या केवळ सुगंधानंच मन प्रफुल्लीत होतं, शरीराला आलेला थकवाही परागंदा होतो ती म्हणजे कॅाफी… पूर्वीपेक्षा आजच्या जनरेशनमध्ये कॅाफी वेगवेगळ्या कारणांमुळं पॅाप्युलर आहे. कॅाफीचा सुगंध, फेसाळता भलामोठा कॅाफी मग, मोठ्या कलाकुसरीनं त्यात चितारलं जाणारं बदामाचं पान-डिझाईन्स आणि जिवलग व्यक्तीचा सहवास… म्हणजे अर्थातच डेट असं काहीसं तरुणाईमध्ये कॅाफीचं समीकरण बनलं आहे. 14 जानेवारीला रसिकांना चित्रपटगृहांमध्ये असाच ‘कॅाफी’चा स्वाद चाखायला मिळणार आहे.
गोड चेहऱ्याची आणि कवी मनाची अभिनेत्री अशी ओळख असणारी स्पृहा जोशी रसिकांसाठी लज्जतदार ‘कॅाफी’ घेऊन आली आहे. तिच्या जोडीला आहेत सिद्धार्थ चांदेकर आणि कश्यप परुळेकर… त्यामुळं प्रत्येकालाच या ‘कॅाफी’ची चव चाखण्याचा मोह नक्कीच होणार आहे.
‘तन्वी फिल्म्स’ची प्रस्तुती असलेल्या ‘कॅाफी’ ची निर्मिती कैलास सोरारी आणि विमला सोरारी यांनी केली असून, या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलं आहे. आजवर नेहमीच विविधांगी विषयांवर चित्रपट बनवणारे नितीन यावेळी प्रेक्षकांसाठी लज्जतदार ‘कॅाफी’ घेऊन आले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना अनोखी प्रेमकथा पहायला मिळणार आहे. प्रेम आणि कॅाफीचा सुखद संगम या चित्रपटाच्या निमित्तानं घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
कॅाफी जशी थोडी गोड, थोडी कडवट असते तशीच लव्हस्टोरीही असते. प्रेमाची अनुभूती झाल्यावर येणारी जवळीक, एकमेकांची ओढ, तास न तास चालणाऱ्या गप्पा, एकमेकांबाबत जाणून घेण्याची उत्सुकता ही प्रेमाची गोड बाजू मानली, तर द्विधा मन:स्थिती, छोटया मोठया कुरबुरी आणि प्रेमातील अडथळ्यांसारख्या कडवट बाजूही अनुभवायला मिळतात. याच कारणांमुळं ‘कॅाफी’ हा चित्रपट आजवर पाहिलेल्या प्रेमकथांपेक्षा एक वेगळी लव्हस्टोरी सांगणारा ठरणार आहे. त्यामुळंच ‘इट्स नॅाट अ लव्ह स्टोरी… इट्स अ स्टोरी ऑफ लव्ह…’ असं ‘कॉफ़ी’ चित्रपटाचं वर्णन सार्थ ठरेल.
या चित्रपटात उत्साही, हरहुन्नरी आणि नेहमी प्रसन्न असणारा सिद्धार्थ दिसेल. कश्यपनं साकारलेल्या कॅरेक्टरचा स्वभाव मात्र काहीसा गंभीर आणि समजूतदार असल्याचं पहायला मिळेल. या दोघांना सांभाळून घेणारी लव्हेबल स्पृहा या चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे.
कथा-पटकथा मच्छिंद्र बुगडे यांनी लिहीली असून, मच्छिंद्र यांनीच नितीन यांच्या साथीनं संवादलेखनही केलं आहे. नितीन यांनी अशोक बागवे यांच्यासोबत या चित्रपटासाठी गीतलेखनही केलं असून, त्यांना तृप्ती चव्हाण यांनी संगीतसाज चढवला आहे. आय. गिरीधरन यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे, तर संकलन राहुल भातणकर यांचं आहे. हरिश आईर यांनी कलादिग्दर्शनाची, तर संजय कांबळे यांनी कार्यकारी निर्मात्यांची जबाबदारी चोख बजावली आहे. 14 जानेवारीला या लज्जतदार कॉफीचा आस्वाद चित्रपटगृहांत घेता येणार आहे.