मी सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे… देवेंद्र फडणवीस यांचा ‘धर्मवीर-2’च्या निमित्ताने सूचक इशारा
धर्मवीरमधून तुम्ही तो काळ जिवंत केला आहे. मला वाटतं की, प्रत्येकाने ज्याने ज्याने हा सिनेमा पाहिला, या सिनेमाने त्या व्यक्तीला पेटवलं, चेतवलं आणि प्रेरणाही दिली. जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा अनेकांना माहीत नव्हतं भाग दोन येईल. शिंदे साहेबांच्या जीवानाचा भाग दोन सुरू होईल. लवकरच तो भाग दोन सुरू झाला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मलाही सिनेमा काढायचा आहे. त्याला अजून वेळ आहे. मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील. अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्यवेळ आली तर सिनेमा काढेनच, असा सूचक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. उद्या गुरु पौर्णिमा आहे. त्यापार्श्वभूमीवर धर्मवीर-2 या सिनेमाच्या ट्रेलरचं आज लॉन्चिंग करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी करताना हा सूचक इशारा दिला आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेते जितेंद्र, अशोक सराफ, गोविंदा, बोम्मन ईराणी, प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यासह राजकीय आणि मराठी सिने इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी धर्मवीर सिनेमाचा एक किस्सा सांगितला. धर्मवीर हा केवळ महाराष्ट्रातील लोकांना आवडला असं नाही. मी गुजरातला गेलो होतो. तिथे एक कार्यकर्ता भेटला. म्हणाला, हमने धरमवीर देखा. मला वाटलं हा जुना धरमवीर सिनेमाबाबत बोलत असावा. त्यानंतर तो म्हणाला वो शिंदे साब का पिक्चर अच्छा लगा. मग माझ्या लक्षात आलं, हा धर्मवीर बदल बोलतो. तो म्हणाला, मुझे वह पिक्चर बहुत अच्छा लगा. सबको अच्छा लगा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
25 वर्ष थांबणार नाहीत
धर्मवीर ही सत्यकथा आहे. एक व्यक्ती सामान्यातून असामान्य कसा होतो आणि अनेक सामान्य माणसाला असामान्य कसा बनवतो हे आपल्याला दिघे साहेबांच्या जीवनातून पाहायला मिळतं. धर्मवीर-3 आणि धर्मवीर-4 ची तयारी करा. कारण दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला. तो 25 वर्ष थांबणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आमच्याही जीवनाची टॅग लाईन
आनंद दिघे साहेबांनी गुरु म्हणून एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता घडवला आणि हजारो अनुयायी घडवले. अशा दिघे साहेबांच्या जीवनावरील चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च झालं आहे. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही ही सिनेमाची टॅग लाईन आहे. केवळ सिनेमा पुरती ही टॅग लाईन मर्यादित नाही. एकनाथ शिंदे असतील किंवा आम्ही सर्व असू आमच्या जीवनाची टॅग लाईन हीच आहे, हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हिणवलं तरी सोनं काय असतं…
दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिंदे यांनी समर्थपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब त्यांना स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती. शिंदे साहेब विचारांशी गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आला. दुर्देवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं.
जेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची ताकद पाठीशी असते तेव्हा कितीही हिणवलं गेलं तरी असली सोनं काय आहे हे जनता हेरून घेते आणि महाराष्ट्रातील जनतेने ते हेरलं. शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं. आता धर्मवीर दोनचा ट्रेलर पाहिला. हा सिनेमा कुठपर्यंत गेला माहीत नाही. आतापर्यंत आला असेल तर त्यात आमचाही रोल असायला पाहिजे थोडासा, असं मिश्किल विधानही त्यांनी केलं.