Mahakumbh 2025: महाकुंभमध्ये प्रवीण तरडेंनी पत्नीसोबत केलं अमृतस्नान; म्हणाले..
मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर प्रयागराजमधील महाकुंभमध्ये अमृतस्नान करण्यासाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे हे पत्नी स्नेहलसोबत पोहोचले. पवित्र स्नानानंतर त्यांनी एक व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज याठिकाणी सुरू असलेल्या महाकुंभामध्ये ‘मौनी अमावस्या’ हा संगमस्नानासाठी सर्वांत पवित्र दिवस मानला जातो. यादिवशी साधूसंतांचं दुसरं शाही स्नानही असतं. ही पर्वणी साधण्यासाठी तब्बल आठ ते दहा कोटी भाविक बुधवारी प्रयागराजमध्ये दाखल झाले. यात अनेक सेलिब्रिटींचाही समावेश होता. भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी, बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान, अभिनेता मिलिंद सोमण यांच्यानंतर आता प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक प्रवीण तरडेसुद्धा महाकुंभमध्ये अमृतस्नान करण्यासाठी पोहोचले. संगममधील पवित्र स्नानानंतर त्यांनी एक व्हिडीओ शूट केला आणि तो फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला. पत्नी स्नेहल तरडेसोबत मिळून त्यांनी प्रयागराजमधील संगममध्ये अमृतस्नान केलं.
या व्हिडीओत प्रवीण तरडे म्हणाले, “आज तीर्थक्षेत्र प्रयागराजला मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर त्रिवेणी संगम याठिकाणी स्नेहलबरोबर पवित्र स्नान केलं. ज्याला आपण अमृतस्नान असं म्हणतो आणि आज सगळ्यांसाठीच गंगामातेला प्रार्थनासुद्धा केली. चला, आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. आज जवळजवळ दहा कोटी भाविक इथे आले आहेत. तुमच्या सगळ्यांचा नमस्कारदेखील गंगामातेला सांगतो आणि तुम्हा सगळ्यांचं शुभ चिंततो. गंगामातेचं हे पवित्र जल आणि हे पवित्र स्नान तुम्हा सर्वांनाही लाभो, याचं पुण्य तुम्हालाही मिळो.” त्यानंतर स्नेहलनेही ‘जय श्रीराम, सनातन धर्म की जय’ अशी घोषणा दिली.




भगवे वस्त्र आणि गळ्यात रुद्राक्ष माळ.. असा वेशात प्रवीण आणि स्नेहल यांनी पवित्र स्नान केलं. प्रवीण तरडेंच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘अतिशय पवित्र दिवशी हा योह तुमच्या आयुष्यात आलाय.. हा योह अक्षय राहील’, असं एकाने म्हटलंय. तर ‘आपण हिंदू संस्कृतीचा अभिमान ठेवून प्रयागराज याठिकाणी महाकुंभ मेळाव्यात अमृतस्नान केलं, हे आपलं परम भाग्यच आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘आम्हाला घरबसल्या त्रिवेणी संगमाचं दर्शन घडवून आणलं, धन्यवाद’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आभार मानले.
दर बारा वर्षांनी प्रयागराजला पूर्ण कुंभ होत असतो. असेच 12 पूर्णकुंभ म्हणजे दर 144 वर्षांनी एक महाकुंभ येतो. यंदा हाच महाकुंभ मकरसंक्रांती ते महाशिवरात्री या कालावधीत प्रयागराजमध्ये होत आहे. जगभरातील 100 देशांमधून तब्बल 40 कोटी भाविक या महाकुंभमध्ये सहभागी होतील, असं म्हटलं गेलंय.