अवघ्या 6 महिन्यात मोडला अभिनेत्रीचा संसार; नंतर ‘आशिकी’ फेम अभिनेत्याशीही टिकलं नाही लग्न
बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्री किंवा अभिनेते हे त्यांच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले. अशीच एक अभिनेत्री म्हणजे राजलक्ष्मी खानविलकर. राजलक्ष्मीने पहिलं लग्न अभिनेता समीर सोनीशी केलं होतं. मात्र अवघ्या सहा महिन्यांत त्यांचा घटस्फोट झाला होता.
मुंबई : 20 मार्च 2024 | प्रसिद्ध गजलकार आणि पार्श्वगायक पंकज उधास हे आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या गाण्यांनी असंख्य श्रोत्यांच्या मनात कोरली गेली आहेत. आपली सुमधूर गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासोबतच पंकज उधास यांनी त्यांच्या म्युझिक व्हिडीओद्वारे अनेक अभिनेत्रींना यश मिळवून दिलं. त्यांचं ‘चुपके चुपके सखियों से वो’ हे गाणं सर्वांत लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. हे गाणं जेव्हा प्रदर्शित झालं होतं, तेव्हासुद्धा हिट ठरलं होतं आणि या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकलेली अभिनेत्रीसुद्धा रातोरात प्रकाशझोतात आली होती. 25 वर्षांपूर्वी पंकज उधास यांचं ‘चुपके चुपके सखियों से वो’ हे गाणं जॉन अब्राहम आणि राजलक्ष्मी खानविलकर यांच्यासोबत शूट करण्यात आलं होतं. या व्हिडीओमुळे जॉन आणि राजलक्ष्मी या दोघांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या व्हिडीओनंतर राजलक्ष्मीविषयी इंडस्ट्रीतही प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं.
राजलक्ष्मी खानविलकरला या म्युझिक व्हिडीओमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली असली तरी बॉलिवूडमध्ये ती स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरली. राजलक्ष्मी तिच्या कामापेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. 1996 मध्ये कॅडबरी कँपेनदरम्यान तिची भेट मॉडेल समीर सोनीशी झाली. या भेटीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि त्यानंतर हळूहळू प्रेमात झालं. या दोघांनी लग्न केलं, मात्र हे लग्न सहा महिनेसुद्धा टिकलं नाही. लग्नाच्या सहा महिन्यांतच राजलक्ष्मी आणि समीर यांनी घटस्फोट घेतला.
नंतर दिलेल्या एका मुलाखतीत समीर सोनीने खुलासा केला की ज्यादिवशी त्याच्या करिअरमधल्या पहिल्यावहिल्या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता, त्याच दिवशी त्याचा घटस्फोट झाला. “ती रात्र मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकतन नाही. माझ्यासाठी तो दुहेरी धक्का होता. माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी अपयशी ठरलो, अशी भावना माझ्या मनात होती. कारण राजलक्ष्मीला घटस्फोट द्यायची माझी इच्छा नव्हती. मला आमच्या नात्याला थोडा आणखी वेळ द्यायचा होता, कारण लग्नाला फक्त सहाच महिने झाले होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाजूने अपयशी ठरलात, असा त्याचा अर्थ होतो”, अशा शब्दांत समीर व्यक्त झाला होता.
समीर सोनीने 2011 मध्ये नीलम कोठारीशी लग्न केलं. या दोघांनी मिळून एका मुलीला दत्तक घेतलंय. तर दुसरीकडे राजलक्ष्मीने 2000 मध्ये ‘आशिकी’ फेम अभिनेता राहुल रॉयशी लग्न केलं. राजलक्ष्मीचं हे दुसरं लग्नसुद्धा फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या 14 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. 2014 मध्ये राजलक्ष्मी आणि राहुल यांनी घटस्फोट घेतला. राहुल रॉयला घटस्फोट दिल्यानंतर राजलक्ष्मी सध्या कुठे आहे आणि काय करते, याविषयी फारशी कोणाला माहिती नाही.