‘या’ कारणासाठी मिलिंदने रागाच्या भरात सेटवरून घेतला काढता पाय
'ती' मागणी पूर्ण न झाल्याने मिलिंदने अर्ध्यातच सोडलं शूटिंग
मुंबई- फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता मिलिंद सोमणने त्याच्या करिअरची सुरुवात सुपरमॉडेल म्हणून केली. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेड इन इंडिया’ या म्युझिक व्हिडीओमुळे तो ‘नॅशनल क्रश’ बनला होता. त्यानंतर त्याने काही जाहिरातींमध्येही काम केलं. मात्र मिलिंदच्या एका चित्रपटाचा किस्सा क्वचितच कोणाला माहीत असेल. मन्सूर खान यांच्या ‘जो जिता वही सिकंदर’ या चित्रपटातील बरीच शूटिंग झाल्यानंतर मिलिंदने काढता पाय घेतला होता. मिलिंदने यामध्ये शेखर मल्होत्राची भूमिका साकारली होती. मात्र नंतर ती भूमिका दीपक तिजोरीला देण्यात आली. एके दिवशी मिलिंद या चित्रपटाच्या सेटवरून रागाच्या भरात निघून गेला होता.
मिलिंदने त्याच्या ‘मेड इन इंडिया’ या आत्मचरित्रात या प्रसंगाचा उल्लेख केला. एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीतही मिलिंदने हा किस्सा सांगितला होता. रागाच्या भरात मिलिंदने सेटवर त्याची सायकल फेकली आणि तिथून काढता पाय घेतला. यामागचं कारण म्हणजे त्याला प्रॉडक्शन टीमकडून सेटवर नाश्ता मिळाला नव्हता.
View this post on Instagram
“माझा नाश्ता कुठे आहे, असा सवाल करत मी माझी सायकल सेटवर फेकली. त्यांनी मला खायला काहीच दिलं नव्हतं. त्यावेळी माझ्यासाठी एखाद्या चित्रपटात काम करण्यापेक्षा ते करताना आनंदी राहणं खूप महत्त्वाचं होतं. जर मी खूश नसेल, तर मी काम कसं करू शकणार”, असं तो म्हणाला. जो जिता वही सिकंदर हा चित्रपट नंतर खूप हिट झाला तरी आयुष्यात त्या गोष्टीचा पश्चात्ताप नसल्याचं मिलिंदने स्पष्ट केलं.
मिलिंद सोमणने 75 टक्के शूटिंग पूर्ण केली होती. ऑडीशनदरम्यान अभिनेता दीपक तिजोरीला नाकारत मिलिंदला भूमिका देण्यात आली होती. मात्र मिलिंदने सेट सोडल्यानंतर पुन्हा ती भूमिका दीपकला मिळाली.