मुंबई : ‘मिर्झापूर’ या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये माधुरी भाभीची भूमिका साकारलेली अभिनेत्री इशा तलवार तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सास बहू और फ्लेमिंगो’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इशासोबत मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे तिच्या डोळ्याला जबर मार लागला. याबद्दलचा खुलासा खुद्द इशानेच केला. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एक तिचा साधा फोटो आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये तिचा एक डोळा पट्टीने झाकलेला पहायला मिळतोय.
इशा तलवारच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर स्क्विब मशीनचा वापर करण्यात आला होता. हा एक अॅक्शन सीन होता आणि त्या स्क्विब मशीनमुळेच इशाच्या डोळ्याला दुखापत झाली. “सेटवर खूपच अंधार होता आणि स्क्विब्स थेट माझ्या डोळ्याला लागली. त्यामुळेच माझा डोळा सूजला आणि नंतर मी तो डोळा उघडूच शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी सहकलाकार दीपक डोब्रियाल यांनी मला डॉक्टरकडे नेलं. त्यानंतरही तीन दिवस मी त्या डोळ्याची नीट उघडझाप करू शकत नव्हती. तीन दिवसांनंतर मी सेटवर परतले”, असं इशाने सांगितलं.
‘सास बहू और फ्लेमिंगो’ या चित्रपटात इशाने डिंपल कपाडिया यांच्या सुनेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिचे बरेच अॅक्शन सीन्स आहेत. डोळ्याच्या दुखापतीनंतर डॉक्टरांनी तिला उजेडात जाण्यास सक्त मनाई केली. त्यामुळे तीन दिवस तिला अंधारातच राहावं लागलं. दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी इशाला अॅक्शन सीन्ससाठी बॉडी डबलचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. मात्र इशाने ते सीन्स स्वत: शूट करण्याचा आग्रह केला होता.
सास बहु और फ्लेमिंगो हा चित्रपट 5 मे रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा सावित्री (डिंपल कपाडिया) आणि तिच्या सुनेंभोवती फिरते. हस्तीपूर इथं राहणारी सावित्री ही बिजली आणि काजल या दोन सूनांसोबत आणि मुलगी शांतासोबत मिळून राणी को-ऑपरेटिव्ह चालवते.