मुंबई : 9 मार्च 2024 | ‘मिस वर्ल्ड’चं यजमानपद 28 वर्षांनंतर भारताकडे परतलं आहे. आज (शनिवार) सर्व जगाचं लक्ष भारताकडे असणार आहे. मिस वर्ल्ड 2023 चा ग्रँड फिनाले आज संध्याकाळी मुंबईतील जियो वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. भारताकडून फेमिना मिस इंडिया 2022 ची विजेती सिनी शेट्टी देशाचं प्रतिनिधीत्व करतेय. 27 वर्षांपूर्वी भारताने या सौंदर्यस्पर्धाचं आयोजन बेंगळुरूमध्ये केलं होतं. मात्र आयोजकांसोबतच अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (ABCL) हा अजिबात चांगला अनुभव नव्हता. गेल्या पाच दशकांपासून सिनेसृष्टीत काम करणारे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील तो वाईट काळ होता. बिग बींना त्यांच्या करिअरमधील यश सहजासहजी मिळालं नाही. यासाठी त्यांनाही बराच संघर्ष करावा लागला. ‘मिस वर्ल्ड’ या सौंदर्यस्पर्धेच्या फिनालेचं आयोजन करणं त्यांच्यासाठी खूप महागात पडलं होतं.
एका मुलाखतीत बिग बींनी सांगितलं होतं की, शो आयोजित करणाऱ्या कंपनीकडून त्यांना भारतात ‘मिस वर्ल्ड’चं आयोजन करण्याचा प्रस्ताव मिळाला होता. मात्र त्याला होकार देण्यासाठी ते घाबरत होते. कारण त्यांच्याकडे सौंदर्यस्पर्धेचा फिनाले आयोजित करण्यासाठी फक्त चार महिने शिल्लक होते. होकार देण्यापूर्वी त्यांनी आपली कंपनी एबीसीएलच्या टीमशी बातचित केली. मात्र पुढे जे घडलं, त्याची कल्पना बिग बींनीसुद्धा केली नव्हती.
बेंगळुरू शहरात ‘मिस वर्ल्ड’च्या फिनालेचं आयोजन होणार असल्याची घोषणा झाली होती. त्यावेळी कर्नाटकात दोन प्रकारच्या आंदोलनांना सुरुवात झाली होती. एकीकडे स्त्रीवादी महिलांचं म्हणणं होतं की अशा पद्धतीच्या सौंदर्यस्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सर्वसामान्य महिलांना कमीपणा दाखवला जातो. महिला जागरूकता संघटनेच्या अध्यक्षा आर. शशिकला यांनी धमकी दिली होती की जर आम्ही मिस वर्ल्डच्या कार्यक्रमाला रोखण्यात अपयशी ठरलो, तर आम्ही आत्महत्या करू. दुसरीकडे काही लोकांचं असंही म्हणणं होतं की अशा पद्धतीच्या कार्यक्रमामुळे समाजाची संस्कृती आणि सभ्यता धोक्यात येईल. हे आंदोलन नंतर इतकं उग्र झालं होतं की अखेर मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यान होणाऱ्या विविध राऊंडपैकी स्विम सूटचा राऊंड बेंगळुरूऐवजी सेशेल्समध्ये करावा लागला.
लोकांकडून अशा नकारात्मक प्रतिक्रिया येणं आश्चर्यकारक होतं. कारण त्याच्या दोन वर्षांपूर्वी ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेनने मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. त्यावेळी भारताने दोघींचंही जल्लोषात स्वागत केलं होतं. जेव्हा 1996 मध्ये मिस वर्ल्डला कट्टरपंथियांकडून अशा नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या, तेव्हा बिग बी चकीत झाले होते. अमिताभ बच्चन यांनी म्हटलं होतं की, मिस इंडियाचं आयोजन 1947 पासून भारतात होतंय आणि त्याला कधीच विरोध झाला नव्हता.
अमिताभ बच्चन यांना वाटलं होतं की मिस वर्ल्डसारख्या कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांना चांगला नफा होईल. मात्र प्रत्यक्षात असं घडलंच नाही. मिस वर्ल्डच्या आयोजनानंतर बिग बी 70 कोटी रुपयांच्या कर्जात बुडाले. या कार्यक्रमानंतर बिग बी त्यांचं कर्जसुद्धा फेडू शकले नव्हते. बँकेनं पैसे वसूल करण्यासाठी त्यांना नोटीससुद्धा बजावली होती. यानंतर हे कर्ज फेडण्यासाठी बिग बींना जुहूमदील त्यांचा बंगला गहाण ठेवावा लागला होता. कंपनीविरोधातील खटला कोर्टापर्यंत पोहोचला होता आणि बिग बींना या खटल्यांना सामोरं जावं लागलं होतं.