मुंबई : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडिलांविषयी वक्तव्य केलं. मिमोहने यावेळी मिथुन यांच्या बी-ग्रेड चित्रपटांचाही उल्लेख केला. “सुदैवाने मी माझ्या वडिलांना एक हिट चित्रपट केल्यानंतर घरीच बसल्याचं पाहिलं नाही”, असं तो म्हणाला. 2000 च्या सुरुवातीला मिथुन यांनी एकानंतर एक बी-ग्रेट चित्रपट का केले, यामागचंही कारण मिमोहने सांगितलं. “माझ्या वडिलांनी जे काही केलं, ते त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी केलं”, असं तो पुढे म्हणाला.
त्यावेळी मिथुन चक्रवर्ती हे सुपरस्टार म्हणून करिअरच्या शिखरावर होते. त्यांनी उटीमधल्या एका हॉटेलमध्ये गुंतवणूक केली होती. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मिमोहला विचारलं गेलं की, “मिथुन दा त्यावेळी कमी बजेटचे चित्रपट करत होते, ज्यामुळे त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जाऊ शकलं असतं. यावर तुझं काय मत आहे?” मिमोहने पहिल्यांदाच त्याच्या वडिलांच्या बी-ग्रेड चित्रपटांवर प्रतिक्रिया दिली. याआधी मिथुन चक्रवर्ती यांचा छोटा मुलगा नमाशी याने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, “वडिलांनी ‘गुंडा’सारखे चित्रपट करायला पाहिजे नव्हते. कारण तो चित्रपट त्यांच्या पातळीपेक्षा खूप खाली होती.”
मिमोहची प्रतिक्रिया ही नमाशीपेक्षा बरीच वेगळी आहे. तो म्हणाला, “प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर माझ्या आईने त्यांचा पडता काळ पाहिला आहे. आम्ही लहान होतो तेव्हा वडील मेगास्टार होते. आई सांगायची की जेव्हा एखादा त्यांचा चित्रपट फ्लॉप व्हायचा, तेव्हा ते नैराश्यात जायचे. ते त्यावेळी एका दिवसात चार शिफ्टमध्ये काम करत होते. प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर ते दोन-दोन तास काम करायचे. त्यांनी करिअरमध्ये बी-ग्रेट चित्रपटसुद्धा आमच्यासाठी केले होते. त्यांचं हॉटेल वाचवण्यासाठी केलं होतं.”
“बॉलिवूड चित्रपटांची प्रत्येक युनिट आणि दाक्षिणात्य चित्रपटांची प्रत्येक युनिट आमच्या हॉटेलमध्ये थांबायची. ते पैशांसाठी असं करत होते, पण त्यांचे निर्माते तोट्यात होते अशी गोष्ट नव्हती. जर ते एका चित्रपटासाठी 70 लाख रुपये खर्च करायचे, तर त्या बदल्यात त्यांना एक कोटी रुपये मिळत होते. त्यांना कधीच कोणती तक्रार नव्हती. आजसुद्धा ते डान्स बांग्ला डान्स, डान्स इंडिया डान्स.. यांसारखे शोज आमच्यासाठी करतात. मला त्यांच्याविषयी फार गर्व आहे. कारण त्यांचा पहिला आणि शेवटचा विचार हा कुटुंबासाठीच असतो”, असं तो पुढे म्हणाला.