फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल; पाकिस्तानी कलाकारांवरून अमेय खोपकरांचा इशारा
आतिफने बॉलिवूड चित्रपटांमधील अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. तेरे संग यारा, तू जाने ना, तेरा होने लगा हूँ, मैं रंग शरबतों का, तेरे बिन यांसारखी त्याची गाणी चांगलीच गाजली आहेत. आता सात वर्षांनंतर तो बॉलिवूडमध्ये काम करण्यास सज्ज झाला आहे. मात्र त्याला मनसेकडून विरोध करण्यात येत आहे.
मुंबई : 5 फेब्रुवारी 2024 | पाकिस्तान गायक आतिफ अस्लम तब्बल 7 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉलिवूड चित्रपट ‘लव्ह स्टोरी ऑफ 90s’च्या निर्मात्यांनी त्यांच्या नव्या चित्रपटासाठी आतिफसोबत कोलॅबोरेट केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी गायकांना बॉलिवूडमध्ये गाण्यास बंदी करण्यात आली होती. आता आतिफ अस्लमच्या कमबॅकवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत, असं मनसेनं पुन्हा एकदा खडसावून सांगितलं आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत याविषयी भाष्य केलं आहे.
अमेय खोपकरांची पोस्ट-
‘अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलिवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलिवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय.
अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव…
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) February 5, 2024
2016 मध्ये झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनने ‘सुरक्षा’ आणि ‘देशभक्ती’चं कारण देत नियम बनवला होता की ते सीमापार कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी देणार नाहीत. यानंतर फवाद खान, माहिरा खान, अली जफर, राहत फतेह अली खान यांसारख्या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये बराच काळ काम केलं नाही.
ऑक्टोबर 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांवरील या बंदीला ‘सांस्कृतिक समरसता, एकता आणि शांतीसाठी प्रतिकूल’ असल्याचं म्हटलं होतं. परदेशातील आणि विशेषकरून शेजारील देशांतील नागरिकांचा विरोध करणं देशभक्तीचं प्रदर्शन करत नाही असं म्हणत कोर्टाने ही बंदी हटवली होती. कोर्टाच्या या निर्णयानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्याचे दरवाजे खुले झाले आहेत. म्हणूनच बऱ्याच वर्षांनंतर आतिफ अस्लम पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज झाला आहे.