Ketaki Chitale: ‘तुमच्याच पक्षातील नेत्यांनी तिला काम दिलं’; केतकी चितळे प्रकरणावरून राज ठाकरेंना नेटकऱ्यांचा टोला
केतकीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. केतकीच्या या पोस्टवरून राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा तिच्या पोस्टचा निषेध व्यक्त केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. केतकीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. केतकीच्या या पोस्टवरून राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा तिच्या पोस्टचा निषेध व्यक्त केला होता. ‘कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रक काढून म्हटलं होतं. मात्र मनसे पक्षातील नेत्यांनीच केतकीला काम दिल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकी काय आहे पोस्ट?
‘स्टार प्रवाहवरती ज्या ‘आंबट गोड’ या सीरिअलमध्ये केतकी चितळे मुख्य भूमिकेत होती, त्या सीरिअलचे निर्माते मनसे चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष असणारे अमेय खोपकर आणि कार्याध्यक्ष असणाऱ्या शालिनी ठाकरे आहेत,’ अशी पोस्ट ट्विटरवर एका युजरने लिहिली. यासोबतच ‘आंबट गोड’ मालिकेचे दिग्दर्शक, लेखक, निर्माते कोण आहेत, हे सांगणारा हे फोटो शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘राजसाहेब म्हणतात कोण तरी अभिनेत्री आहे. कोण तरी कशी? असे साहेब तुमच्या पक्षातील नेत्यांनी तिला काम दिलं आणि तुम्ही म्हणता कोण तरी अभिनेत्री? नेमकी ती विकृती वाढवली कोणी,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर आणखी एका युजरने केतकी आणि राज ठाकरेंचा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये केतकी ही राज ठाकरेंना राखी बांधताना दिसत आहे.
पहा ट्विट-
स्टार प्रवाहवरती ज्या “आंबट गोड” या सीरिअलमध्ये केतकी चितळे मुख्य भूमिकेत होती त्या सीरिअलचे निर्माते मनसे चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष असणारे अमेय खोपकर आणि कार्याध्यक्ष असणाऱ्या शालिनी ठाकरे आहेत. pic.twitter.com/uMjDXDXSxd
— yogesh sawant (@yogi_9696) May 15, 2022
राज ठाकरेंची प्रतिक्रिया
‘महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्षे कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत… आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे,’ असंही राज ठाकरेंनी पत्रकात म्हटलं होतं.