मराठी कलासृष्टीला मिळणार मनसेची सुरक्षा, अमेय खोपकर यांचं मराठी कला विश्वाला आवाहन
आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतलीय. मराठी कलासृष्टीला मनसेची सुरक्षा मिळणार आहे. त्याबाबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक निवदेन प्रसिद्ध केलंय.
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू उर्फ राजेश सापते यांनी आत्महत्या केल्यानंतर मराठी कला विश्वात एकच खळबळ उडाली आहे. राजू सापते यांनी शनिवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. सापते यांच्या आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आलीय. याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतलीय. मराठी कलासृष्टीला मनसेची सुरक्षा मिळणार आहे. त्याबाबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक निवदेन प्रसिद्ध केलंय. (Raj Thackeray is aggressive after the suicide of art director Raju Sapte)
मराठी कलासृष्टीला मिळणार मनसे सुरक्षा. दुर्दैवी घटना राजू सापते यांच्याबाबत घडली. त्याबाबत ह्या परप्रांतीय मुजोरीला संपवण्यासाठी सन्माननीय राज ठाकरे यांनी गंभीरपणे लक्ष घालण्याचं ठरवलं आहे. यापुढे मराठी माणसाच्या चित्रीकरण स्थळी कुठलीही संघटना येणार नाही. ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे त्यांनी 6 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता कृष्णकुंज दादर इथं यावं, असं आवाहन अमेय खोपकर यांनी केलंय.
व्हिडीओत नाव घेतलेल्या नरेश मिस्त्रीलाही अटक
राजू उर्फ राजेश सापते (Raju Sapte) यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिस्त्री नरेश विश्वकर्मा याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. काल सापतेंचा व्यावसायिक भागीदार चंदन ठाकरेला अटक झाली होती. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ प्रसिद्ध करत राजू सापतेंनी युनियनचे पदाधिकारी आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी नरेश मिस्त्रीचं नाव घेतलं होतं.
राजू सापते यांची आत्महत्या
कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. काम करत असताना एका युनियनच्या पदाधिकारी त्रास देत असल्याचे त्यांनी या व्हिडीओत म्हटलंय. त्यांनी पुण्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी आपल्या आत्महत्येचे कारण आणि आपल्या व्यथा सांगितल्या आहेत.
काय म्हणले होते राजू सापते?
आत्महत्येपूर्वी त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये राजू म्हणतात, ‘नमस्कार मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिथे थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिथे नाही. राकेश मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.’
‘हे कालही मी क्लीअर केलं आहे की नरेश मेस्त्री नामक व्यक्तीने फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितले की माझे पेमेंट पूर्ण आहे. नरेश मेस्त्रींनी हेही सांगितलं की आजपर्यंत दादांनी कोणतही पेमेंट अर्धवट ठेवलेलं नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतवत आहेत. ते माझं कुठचंही काम सुरु होऊ देत नाहीयत. सध्या माझ्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तत्काळ सुरु करायचे आहे. त्यातलं एक प्रोजेक्ट झीचं मला सोडून द्यावं लागलं. कारण मला ते कामच करू देत नाहीयत. तसंच दशमी क्रिएशनचं काम सुरु असताना त्यांनी ते थांबवलं आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.’
संबंधित बातम्या :
व्हिडीओ पोस्ट करत कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या; ‘या’ लोकांना धरलं जबाबदार
कला दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरण, पुण्यात एकाला अटक, चौघांचा शोध सुरु
Raj Thackeray is aggressive after the suicide of art director Raju Sapte