मनसेची एन्ट्री अन् …. प्रसाद खांडेकर यांचा ‘एकदा येऊन तरी बघा’ सिनेमागृहात झळकला
मनसेची एन्ट्री होताच थिएटर मालकांचा थरकाप, प्रसाद खांडेकर यांचा 'एकदा येऊन तरी बघा' सिनेमागृहात झळकला... मनसेने पत्राद्वारे थिएटर मालकांना इशारा दिल्यानंतर मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकला
अक्षय मंकनी, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 10 डिसेंबर 2023 : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज विधानपरिषदेत भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मराठी चित्रपटाला थिएटर उपलब्ध करून दिलं जात नाही… असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देखील दिलं होतं. ‘मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. पण ते थिएटर उपलब्ध करून दिले जाईल…’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. दरम्यान, याप्रकरणी मनसे कडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. मनसेच्या एन्ट्रीनंतर ‘एकदा येऊन तरी बघा’ या मराठी चित्रपटाला थिएटर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
चेंबूर मनसे विभागाध्यक्ष माऊली थोरावे यांनी चेंबूर भागातील के स्टार आणि क्यूबिक मॉलच्या थिएटर मालकांना पत्राद्वारे निवेदन दिलं. ‘थिएटरच्या स्क्रीनवर मराठी चित्रपट लागला पाहिजे. मराठी माणसांची गळचेपी आम्ही सहन करणार नाही…’ असा इशारा मनसेने पत्राद्वारे थिएटर मालकांना दिला होता.
मनसेने पाठवलेल्या पत्रानंतर चित्रपटगृहात प्रसाद खांडेकर स्टारर ‘एकदा येऊन तरी बघा’ चित्रपटाचा शो लावण्यात आला आहे. ‘मराठी चित्रपटांना मल्टिपलेक्समध्ये स्क्रीन मिळत नाही यावर अधिवेशनात चर्चा होणं फार दुर्दैवी आहे. आम्ही मराठी माणसाच्या हक्कासाठी सदैव लढत आलो आहोत. आता आम्ही चित्रपटगृहाच्या मालकांना पत्र दिलं आहे. जर चित्रपट लागला तर ठीक आहे, नाही लागला तर आम्ही खळ-खट्याक करणार…’ असा इशारा माऊली थोरावे यांनी दिला.
View this post on Instagram
‘एकदा येऊन तरी बघा’ या मराठी चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, चित्रपट 8 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांनी केलं आहे. सिनेमात, गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, तेजस्वीनी पंडीत, ओमकार भोजने, प्रसाद खांडेकर, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, वनिता खरात, रोहित माने, नम्रता संभेराव… यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘एकदा येऊन तरी बघा’ या मराठी चित्रपटाची चर्चा सुरु आहे. प्रसाद खांडेकर यांच्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात विनोदी कलाकार मुख्य भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आले आहेत.