चित्रपट – शेरशाह
स्टारकास्ट – सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी
आपल्या देशाचे सैन्य (India Army) हे नेहमी शांततेसाठी काम करतं आणि त्या शांततेचं रक्षण करण्यासाठी ते काय करू शकतात? असा प्रश्न कधी पडला असेल तर या प्रश्नाचे उत्तर शेरशाह (Shershaah) चित्रपट पाहिल्यावर कायमचे लक्षात राहिल. कॅप्टन विक्रम बत्राच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा तुम्हाला हिमाचलच्या पालमपूरपासून कारगिलच्या टायगर हिलपर्यंत घेऊन जातो. त्याच्या शौर्याचा उत्साह पाहून, तुमच्या अंगावर शहारा येईल हे नक्की.
शेरशाहची कथा
ही कथा आहे कारगिलमध्ये शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या बायोपिक आधारित, ज्यांनी पाकिस्तानच्या भ्याड सैनिकांना तेथून पळून जाण्यास भाग पाडलं. टायगर हिलवर पुन्हा भारताचा तिरंगा फडकवला. शेरशाह हा चित्रपट तुम्हाला त्यांच्या बालपणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतच्या प्रवासात त्यांच्यासोबत राहण्याची संधी देणारा आहे. 2 तास 15 मिनिटांच्या या चित्रपटात कॅप्टनची कथा तुमच्या मनावर इतकी छाप पाडेल की तुम्ही आयुष्यभर त्यांच्या आठवणी विसरू शकणार नाही.
लहानपणापासून जे हवं ते जिंकायची जिद्द
चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की, कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यात लहानपणापासूनच जे हवं ते जिंकायची जिद्द असायची, मग तो छोटा बॉल असो किंवा सैन्यात लेफ्टनंटची नोकरी. कॉलेजमध्ये ते डिंपल चीमा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतात. डिंपलची भूमिका कियारा अडवाणीनं साकारली आहे. विक्रम हे डिंपलशी लग्न करण्याचा निर्णय घेतात. डिंपलच्या वडिलांनी त्यांच्याशी लग्न करण्याबाबत नकार दिल्यावर विक्रम यांनी ठरवलं की ते आधी सैन्यात जाऊन करिअर करणार आणि नंतर डिंपलशी लग्न करणार.
लग्नाची मागणी घालायला जातात आणि…
विक्रम यांना काश्मीरमध्ये पहिली पोस्टिंग मिळते आणि ते लष्कराच्या डेल्टा कंपनीचे लेफ्टनंट म्हणून काम करतात. त्यांच्या वागण्यानं ते काश्मीरच्या स्थानिक लोकांच्या हृदयात स्थान मिळवतात आणि हळूहळू त्यांच्या युनिटचे सर्वात धाडसी अधिकारी बनतात. जेव्हा ते आपल्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी रजेवर घरी जातात, तेव्हा टीव्हीवर बातम्या येतात की पाकिस्तानी घुसखोरांनी कारगिलची सर्वोच्च शिखरे काबीज केली आहेत. घुसखोरीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या कॅप्टन सौरभ कालियाचं पाकिस्तानी सैन्यानं अपहरण केलं आणि त्याला मारुन मृतदेहाची क्रूरता केल्यावर ते सैन्याला परत केलं तेव्हा विक्रम बत्रा लग्नाचं सर्व विसरतात.
टायगर हिलवर खरा टायगर
सर्वप्रथम, त्यांना पाकिस्तानकडून पॉईंट 5140 परत घेण्याचं काम दिलं जातं. जो कॅप्टन, अतिशय धैर्यानं लढत पुन्हा भारताचा ताबा घेतो. त्यानंतर, कॅप्टन विक्रम बत्रा स्वतः टायगर हिलचा कोड दिलेला पॉइंट 4875 काबीज करण्याची जबाबदारी घेतो आणि नंतर त्याच्या टीमसह पाकिस्तानी सैनिकांना धडा शिकवतात. पाकिस्थानी सैनिकांना पकडण्यासाठी त्यांना समोरून हल्ला करावा लागतो आणि आपल्या सहकारी सैनिकांना वाचवण्यासाठी ते शत्रूच्या गोळ्यांचे बळी ठरतात. पण त्याचा शेवटचा श्वास तेव्हाच बाहेर पडतो जेव्हा ते बघतात की त्याच्या टीमनं टायगर हिलवर परत तिरंगा फडकवला आहे.
नकारात्मक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करा
शेर शाहचा सर्वात मजबूत भाग म्हणजे या चित्रपटातील कॅप्टन विक्रम बत्राच्या शौर्याची कथा. म्हणूनच आम्ही चित्रपटासारखे त्याचे पुनरावलोकन केलं नाही. विक्रम बत्राच्या कथेसमोर, या चित्रपटाच्या सर्व किरकोळ नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला फक्त एवढंच सांगू की लष्कराच्या शौर्यावर बनवलेला हा चित्रपट पाहिल्यानंतर फक्त कॅप्टन विक्रम बत्रा यांचा आवडता नारा तुमच्या हृदयात लक्षात राहणार आहे आणि ते आहे ‘ये दिल मांगे मोरे…’
पाहा ट्रेलर
संबंधित बातम्या