मुंबई | 17 जुलै 2023 : मुकेश अंबानी आणि ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचा एक भाग असलेला रिलायन्स ब्रँड्स हा अभिनेत्री आलिया भट्टची कंपनी खरेदी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आलिया भट्टने लहान मुलांच्या कपड्यांचा ‘एड-ए-मम्मा’ (Ed-a-Mamma) हा ब्रँड लाँच केला होता. ‘द इकोनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, अंबानी आलियाचा हा ब्रँड तब्बल 300 ते 350 कोटी रुपयांच्या डीलमध्ये खरेदी करण्याचा विचार करत आहेत. आलियाने ऑक्टोबर 2020 मध्ये ‘एड-ए-मम्मा’ हा ब्रँड लाँच केला होता. तेव्हापासून या ब्रँडला खरेदीदारांकडून खूप प्रतिसाद मिळाला. या ब्रँडचे कपडे बहुतांश ऑनलाइन वेबसाइट्सवर उपलब्ध आहेत. त्याचसोबत आलिया भट्टने या ब्रँडची अधिकृत वेबसाइटसुद्धा ग्राहकांच्या भेटीला आणली होती. लहान मुलांच्या कपड्यांच्या सेगमेंटमध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी मुकेश अंबानी ‘एड-ए-मम्मा’ हा ब्रँड खरेदी करण्याचा विचार करत आहेत.
आलिया भट्टच्या या ब्रँडचं मूल्य या वर्षाच्या सुरुवातीला जवळपास 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं मानलं जात आहे. 2 ते 14 वयोगटातील मुलामुलींचे कपडे या ब्रँडअंतर्गत विकले जात आहेत. आलियाचा हा ब्रँड पूर्णपणे स्वदेशी आहे. त्याचसोबत हा ब्रँड लाँच झाल्यापासून D2C (डायरेक्ट टू कन्स्युमर) बिझनेस मॉडेलवर काम करत आहे. तर दुसरीकडे रिलायन्स रिटेलचं मूल्यांकन तब्बल 9,18000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आलियाचा ब्रँड त्यांनी अधिग्रहण केल्यास त्याचा आणखी वेगाने व्यवसाय वाढण्याचा अंदाज आहे.
मुकेश अंबानी यांनी ऑगस्ट 2022 मध्ये ईशा अंबानीकडे रिलायन्स रिटेलची जबाबदारी सोपवली आहे. त्यावेळी कंपनी 2 लाख कोटी रुपयांची उलाढाल करत होती. जिमी चू, जॉर्जियओ अर्मानी, ह्युगो बॉस, व्हर्साची, मायकल कॉर्स, ब्रुक्स ब्रदर्स, अर्मानी एक्सचेंज, बर्बेरी आणि इतर अनेक जागतिक ब्रँड रिलायन्स रिटेलचे भागीदार ब्रँड म्हणून भारतात उपलब्ध आहेत.