Pravin Tarde | ‘मुळशी पॅटर्नच्या रिमेकच्या नावाखाली सलमानने कचराच केला’; प्रवीण तरडे भडकले
अंतिम : द फायनल ट्रुथ या चित्रपटात सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्यासोबतच प्रज्ञा जयस्वाल, महिमा मकवाना आणि सयाजी शिंदे यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटातील विघ्नहर्ता गाण्यात अभिनेता वरुण धवन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला होता.
मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून तोंडभरून कौतुक झालं होतं. या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता सलमान खानने त्याचा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला. मेहुणा आयुष शर्मासोबत मिळून त्याने ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या नावाने हा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आणला. मात्र मराठीत हिट ठरल्यानंतर त्याच्या हिंदी रिमेकला प्रेक्षकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रवीण तरडे आणि उपेंद्र लिमये यांनी सलमानच्या ‘अंतिम’वर टीका केली आहे. यावेळी तरडेंनी असंही सांगितलं की त्यांनी अद्याप ‘अंतिम’ हा चित्रपट पाहिला नाही. सलमानच्या या रिमेकचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं.
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तरडे म्हणाले, “मुळशी पॅटर्न हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमानने आपला कॉलर वर केला आणि म्हणाला.. काय चित्रपट आहे, काय चित्रपट आहे. पण जेव्हा त्याने मुळशी पॅटर्नचा रिमेक केला, तेव्हा त्याने त्याची वाट लावली.” यावेळी तरडेंनी असंही स्पष्ट केलं की आपल्या कामाने प्रभावित होऊन सलमानने ‘अंतिम’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिली होती. मात्र शूटिंगदरम्यान सलमानकडून अती प्रमाणात ढवळाढवळ झाल्यामुळे त्यांनी हा प्रोजेक्ट सोडला.
“महेश सरांनी त्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. माझं त्या रिमेकशी काहीच घेणंदेणं नाही. पण आज मी हे सार्वजनिकरित्या सांगू इच्छितो की मी आजवर तो रिमेक पाहिला नाही. मी हे धाडस करूच शकत नाही कारण माझ्या डोक्यात आणि मनात फक्त मुळशी पॅटर्न आहे. मला लोकांनीही हेच सांगितलं की अंतिमपेक्षा मुळशी पॅटर्न हा चांगला चित्रपट आहे”, असं तरडे पुढे म्हणाले.
उपेंद्र लिमये यांनी मुळशी पॅटर्न आणि अंतिम अशा दोन्ही चित्रपटांमध्ये काम केलं. यावेळी त्यांनीही प्रवीण तरडे यांच्या वक्तव्यांशी सहमती दर्शवली. ते म्हणाले, “त्यात काही प्रश्नच नाही. मी दोन्ही चित्रपटांमध्ये काम केलं. मी हे स्पष्टपणे सांगू शकतो की तरडेंनी चित्रपटात मुळशीच्या मातीतील जी प्रामाणिकता दाखवली, ती रिमेकच्या नावाखाली नष्ट करण्यात आली. माझ्या मते त्यांनी जसाच्या तसा रिमेक केला असता, तरी लोकांना आवडलं असतं.”
अंतिम : द फायनल ट्रुथ या चित्रपटात सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्यासोबतच प्रज्ञा जयस्वाल, महिमा मकवाना आणि सयाजी शिंदे यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटातील विघ्नहर्ता गाण्यात अभिनेता वरुण धवन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला होता.