तिचं स्वत:चं लग्न नरकासमान..; लिव्ह-इन रिलेशनशिपचा सल्ला देणाऱ्या झीनत अमान यांच्यावर भडकल्या मुमताज
अभिनेत्री झीनत अमान यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट लिहित लिव्ह इन रिलेशनशिपचं समर्थन केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री मुमताज यांनी झीनत अमान यांना थेट चुकीचं ठरवलं आहे.
दिग्गज अभिनेत्री झीनत अमान यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तरुणाईला लिव्ह-इन रिलेशनशिपबाबच सल्ला दिला होता. तरुणांनी एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी आणि मजबूत नातं तयार होण्यासाठी लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहायला हवं, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली होती आणि त्यावर विविध प्रतिक्रियासुद्धा आल्या होत्या. आता आणखी एका दिग्गज अभिनेत्रीने झीनत अमान यांच्या या सल्ल्याला थेट चुकीचं ठरवलं आहे. अभिनेत्री मुमताज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपलं मत मांडलंय.
‘झूम’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुमताज म्हणाल्या, “मी झीनत यांच्याशी सहमत नाही. कितीही लिव्ह-इनमध्ये राहिलात तरी काय गॅरंटी आहे? अनेक महिने लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतरही तुमचं लग्न यशस्वी होईल याची काय गॅरंटी आहे? मी तर म्हणते, लग्नच नको. दिवस आणि वयाच्या बंधनात स्वत:ला बांधण्याची काय गरज आहे? लग्न कशाला पाहिजे? मुलांसाठी का? अरे, मुलांसाठी बाहेर पडा, अशा व्यक्तीला शोधा तो तुमच्यासाठी बनला असेल. हे जग खूप पुढे निघून गेलंय. आपल्या मुलींना हा विश्वास दाखवून मोठं करा की त्यांचं अस्तित्व पूर्ण होण्यासाठी कोणत्याही पुरुषाची गरज नाही. माझ्या लग्नाला 40 वर्षे झाली आहेत. लग्नाचं बंधन खूप जपावं लागतं. हे सोपं नसतं.”
View this post on Instagram
लिव्ह-इन रिलेशनशिपसाठी भारतीय समाज अद्याप तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याविषयी मुमताज पुढे म्हणाल्या, “आपण काय सल्ला देतोय याची झीनत अमान यांनी काळजी घ्यायला हवी. त्यांना सोशल मीडियावर अचानक ही लोकप्रियता मिळाली आहे आणि कुल आंटी बनण्याची त्यांची ही उत्सुकता मी समजू शकते. पण आपल्या नितीमूल्यांच्या विरोधात जाऊन असा सल्ला देणं हा काही फॉलोअर्स वाढवण्यासाठीचा उपाय नाही. मुलींनी जर लिव्ह-इनची संस्कृती अंगीकारायला सुरुवात केली तर एक संस्था म्हणून विवाह कालबाह्य होईल. मला प्रामाणिकपणे सांगा की तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न असं एका मुलीशी करून द्याल का, जी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. तुम्ही उदाहरण म्हणून झीनत यांच्याकडेच पाहा. त्या लग्नाच्या बऱ्याच वर्षांपूर्वी पती मजहर यांना ओळखत होत्या. पण त्यांचं स्वत:चं लग्न हे नरकासमान होतं. खरंतर रिलेशनशिपबद्दल सल्ला देणाऱ्यांमध्ये त्या शेवटच्या व्यक्ती असायला हव्यात.”