मुंबई : 30 जानेवारी 2024 | स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा ‘बिग बॉस 17’चा विजेता ठरला. बिग बॉसची ट्रॉफी, 50 लाख रुपये आणि ह्युंडाई क्रेडा कार मुनव्वरने आपल्या नावे केली. या विजयानंतर मुनव्वर जेव्हा डोंगरीला परतला, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी हजारो चाहते रस्त्यावर आले होते. डोंगरीत अत्यंत जल्लोषाने मुनव्वरचं स्वागत करण्यात आलं. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये मुनव्वर त्याच्या कारच्या सनरुफमधून हातात ट्रॉफी घेऊन बाहेर येतो. त्याच्या कारच्या चारही बाजूंना लोकांची झुंबड पहायला मिळतेय. मुनव्वर त्याच्या हातातील ट्रॉफी चाहत्यांसमोर उचलतो, तेव्हा एकच जल्लोष होतो.
मुनव्वरची एक झलक पाहण्यासाठी, त्याच्याशी हात मिळवण्यासाठी, फोटो क्लिक करण्यासाठी चाहत्यांची चढाओढ सुरू होती. यावेळी मुनव्वरनेही हात जोडून चाहत्यांचे आभार मानले. मुनव्वरला पाहण्यासाठी झालेली गर्दी अचंबित करणारी आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर मुनव्वरने सूत्रसंचालक सलमान खानसोबतचा फोटो पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले. ‘खूप खूप आभार जनता. तुमचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे अखेर ट्रॉफी डोंगरीतच आली’, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या. यावेळी त्याने सलमान खानचेही आभार मानले.
बिग बॉसचा विजेता घोषित झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुनव्वर म्हणाला, “मी खूप खुश आणि कृतज्ञ आहे. मी खूप नशिबवान आहे की माझा इतका मोठा फॅन फॉलोइंग आहे. मी माझ्या आनंदी आणि दु:खी क्षणांमध्ये आईवडिलांना आठवतो.” बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये मुनव्वरसोबत अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांची टक्कर होती. यापैकी सर्वांत आधी अरुण माशेट्टी घराबाहेर पडला. त्यानंतर अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा बाद झाले. अखेरची चुरस ही मुनव्वर आणि अभिषेक यांच्यात रंगली होती.
मुनव्वरचा जन्म 28 जानेवारी 1992 रोजी गुजरातमधील जुनागडमध्ये झाला. तो स्टँडअप कॉमेडियन आणि रॅपरसुद्धा आहे. गुजराती मुस्लीम कुटुंबातील मुनव्वरला लहानपणापासून अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्याला काम करावं लागलं होतं. मुनव्वरने कमी वयात अनेक छोटी-मोठी कामं करून कुटुंबीयांची आर्थिक मदत केली आहे. आईच्या निधनानंतर तो मुंबईला आला. 2020 मध्य्ये मुनव्वरच्या वडिलांचंही निधन झालं. त्याचवर्षी त्याने त्याच्या युट्यूब चॅनलवर स्टँडअप कॉमेडीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘दाऊद, यमराज अँड औरत’ या व्हिडीओमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.