इफ्तार पार्टीसाठी बोलावून मुनव्वर फारुकीवर फेकली अंडी? व्हिडीओ व्हायरल
'बिग बॉस 17'चा विजेता आणि प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सध्या त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. मुंबईतल्या मोहम्मद अली रोज याठिकाणी तो इफ्तार पार्टीसाठी गेला होता. मात्र एका रेस्टॉरंटच्या मालक आणि कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर अंडी फेकली.
‘बिग बॉस 17’चा विजेता मुनव्वर फारुकीवर मंगळवारी रात्री अंडी फेकण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुनव्वरला मुंबईतल्या प्रसिद्ध मोहम्मद अली रोड याठिकाणी असलेल्या ‘नूरानी स्वीट शॉप’च्या मालकाने इफ्तार पार्टीसाठी बोलावलं होतं. मुनव्वर जेव्हा त्याठिकाणी पोहोचला तेव्हा त्याने त्याच परिसरातील आणखी एका रेस्टॉरंटलाही भेट दिली. यावरून भडकलेल्या ‘नूरानी स्वीट शॉप’च्या मालकाने आणि त्याच्या पाच कर्मचाऱ्यांनी मुनव्वरवर अंडी फेकण्यास सुरुवात केली. या घटनेवरून मुनव्वर प्रचंड भडकला. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये मुनव्वर संबंधिक मालकावर भडकल्याचं दिसून येत आहे.
मालकाने मुनव्वरवर अंडी फेकल्यानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला. मुनव्वरला तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थांबवलं आणि गर्दी नियंत्रणात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पायधुणी पोलिसांनी संबंधित दुकानाचा मालक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
याआधीही मुनव्वरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो इफ्तार पार्टीसाठी बाहेर पडला असता चाहत्यांनी त्याच्याभोवती घोळका केला होता. असंख्य चाहत्यांच्या गर्दीतून बॉडीगार्ड मुनव्वरचं संरक्षण करताना या व्हिडीओत दिसला. यावेळी अनेकांनी मुनव्वरसोबत सेल्फी काढला आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. मुनव्वरने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांचे आभार मानले.
पहा व्हिडीओ
Kalesh b/w Public and Munawar Faruqi’s at Mashaallah Restaurant Followed by Egg-Throwing Incident” pic.twitter.com/90vtRmdMSG
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 10, 2024
मार्च महिन्यात मुनव्वरसह इतर सात जणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील एका हुक्का पार्लरमधून यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांच्या सोशल सर्व्हिस ब्रांचला याविषयीची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी बोरा बाजारमधील हुक्का पार्लरवर छापा टाकला होता. पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर मुनव्वरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये उपरोधिक पोस्ट लिहिली होती. अक्षय कुमारच्या प्रसिद्ध ‘हुक्का बार’ या गाण्यातील काही ओळी त्याने लिहिल्या होत्या.
मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आणि रॅपरसुद्धा आहे. गुजराती मुस्लीम कुटुंबातील मुनव्वरला लहानपणापासून अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्याला काम करावं लागलं होतं. मुनव्वरने कमी वयात अनेक छोटी-मोठी कामं करून कुटुंबीयांची आर्थिक मदत केली आहे. आईच्या निधनानंतर तो मुंबईला आला. 2020 मध्य्ये मुनव्वरच्या वडिलांचंही निधन झालं. त्याचवर्षी त्याने त्याच्या युट्यूब चॅनलवर स्टँडअप कॉमेडीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘दाऊद, यमराज अँड औरत’ या व्हिडीओमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.