राजकारण्यांच्या धमकीनंतर विजय सेतुपतीची बायोपिकमधून माघार; प्रसिद्ध क्रिकेटरकडून मोठा खुलासा
साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीने काही वर्षांपूर्वी एक बायोपिक साइन केला होता. एका प्रसिद्ध क्रिकेटरचा हा बायोपिक होता. मात्र नंतर काही कारणास्तव त्याने या चित्रपटातून माघार घेतली. यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. क्रिकेटरनेच या कारणाचा खुलासा केला आहे.
मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : विजय सेतुपती हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. टॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. नुकतंच त्याने शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याने साकारलेल्या खलनायकी भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं. मात्र एक काळ असाही होता, जेव्हा विजयला एक बायोपिक साइन करणं खूप महागात पडलं होतं. श्रीलंकन क्रिकेटर मुथैय्या मुरलीधरनचा हा बायोपिक होता. ज्यामध्ये सर्वांत आधी विजयची निवड मुख्य भूमिकेसाठी करण्यात आली होती. मात्र नंतर त्याने या बायोपिकमधून माघार घेतली. त्यामागचं धक्कादायक कारण नुकतंच मुरलीधरनने सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याबद्दलचा खुलासा केला आहे.
मुथैय्या मुरलीधरनचा खुलासा
‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुरलीधरन म्हणाला, “मी आयपीएलमध्ये खेळत असताना, माझ्या दिग्दर्शकांनी सांगितलं होतं की विजय सेतुपतीसुद्धा माझ्याच हॉटेलमध्ये थांबला आहे. त्यांनी त्याच्यासोबत भेट घडवून आणण्याचं ठरवलं होतं. विजयसुद्धा माझा चाहता होता म्हणून त्याने भेटायला लगेच होकार दिला. भेटीच्या पाच दिवसांनंतर त्याला स्क्रिप्ट ऐकवण्यासाठी दोन तासांची वेळ निश्चित करण्यात आली होती. स्क्रिप्ट ऐकल्यानंतर त्याने चित्रपटाविषयी फार उत्सुकता व्यक्त केली. अशी अनोखी संधी हातातून गमावणार नाही, असं म्हणत त्याने लगेच होकार कळवला होता. अखेर ही डील निश्चित झाली आणि प्रॉडक्शन हाऊससुद्धा निर्मितीसाठी तयार होतं.”
विजय सेतुपतीची माघार
या मुलाखतीत मुरलीधरनने पुढे सांगितलं की नंतर काही राजकारण्यांनी विजय सेतुपतीला धमक्या दिल्या होत्या. “माझ्या काही वक्तव्यांमुळे त्यांनी विजयला बायोपिकला काम न करण्यासाठी धमक्या दिल्या होत्या. मला त्याच्या करिअरमध्ये अडथळा निर्माण करायचा नव्हता. 800 हा फक्त एक स्पोर्ट्स फिल्म असून त्याचा राजकारणाशी काहीच संबंध नाही”, असं त्याने पुढे सांगितलं. विजय सेतुपतीची या चित्रपटातून एग्झिट झाल्यानंतर ‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम अभिनेता मधूर मित्तलची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली. 800 हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमिळ, इंग्रजी आणि सिन्हाला भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.