‘लहानपण हरवून बसली..’; मायरा वायकुळला रडताना पाहून नेटकऱ्यांचा संताप, पालकांनाही सुनावलं
बालकलाकार मायरा वायकुळचा 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यापूर्वी या चित्रपटाचा प्रीमिअर पार पडला होता. या प्रीमिअरदरम्यान मायराला रडू कोसळलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय झालेली बालकलाकार मायरा वायकुळ नुकतीच एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 31 जानेवारी रोजी मायराचा ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या नावामुळे आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे त्याच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरला मायरासह इतरही कलाकार उपस्थित होते. प्रीमिअरला मिळालेला प्रतिसाद पाहून मंचावर उभ्या असलेल्या मायराच्या डोळ्यात आपसूकच पाणी आलं. त्याचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. मात्र याच व्हिडीओवरून मायरा आणि तिच्या आईवडिलांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय.
मायराच्या रडण्याच्या व्हिडीओ नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘लहानपण हरवून बसली’, असं एकाने लिहिलं. तर ‘लहानपण विसरून गेली. लहान मुलीच्या चेहऱ्यावर इतकी मॅच्युरिटी बरं दिसत नाही’ असं दुसऱ्याने म्हटलंय. तर आणखी एका युजरने लिहिलं, ‘माफ करा, पण तिच्या पालकांना एकच गोष्ट सांगायची आहे की पैसा आणि प्रसिद्धीच्या नादात तुम्ही मुलीचं बालपण संपवून टाकलं आहे.’




View this post on Instagram
‘करत असेल अॅक्टिंग चांगली पण जन्माला आल्यापासूनच रील्स आणि मग अॅक्टिंग यात या पोरीचं बालपण प्रौढ झालं. ती कधीच बालिश बोलत नाही. खूपच अति मॅच्युअर मुलीप्रमाणे वागत असते. जे तिच्या वयाला बिलकुल चांगलं नाही. पण हिच्या पालकांना हे कळत नाहीह. तिच्या भविष्यासाठी हे चांगलं नाही,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.
‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटात मायरा वायकुळची मध्यवर्ती भूमिका आहे. त्याचबरोबर अभिनेत्री कल्याणी मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता मंगेश देसाई, कमलेश सावंत, सविता मालपेकर, प्रथमेश परब, सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर आदी कलाकारांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटातून एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगण्यात आली आहे. एका लहान मुलीच्या दृष्टिकोनातून तिच्या शोधाचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीनं ही गोष्ट उलगडणार असून सहकुटुंब हा चित्रपट पाहता येणार आहे.