लग्न करून आयुष्य उद्ध्वस्त; ‘महाभारत’ फेम अभिनेत्याचा घटस्फोट, AI इंजीनिअर अतुल सुभाषशी केली तुलना
'महाभारत' या मालिकेतून करिअरची सुरुवात करणारा अभिनेता अरुण सिंह राणा याने लग्नाच्या सहा वर्षांनंतर पत्नीला घटस्फोट दिला आहे. या घटस्फोटानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो वैवाहिक आयुष्यातील संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.
‘महाभारत’ आणि ‘नागिन 6’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता अरुण सिंह राणा याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला. वैवाहिक आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याने लग्नाच्या सहा वर्षांनंतर घटस्फोट घेतल्याचं त्याने सांगितलं आहे. अरुणने 2013 मध्ये ‘महाभारत’ या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने ‘दिया और बाती हम’ आणि ‘नागिन 6’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. अरुणने 29 जून 2018 रोजी शिवानीशी अरेंज मॅरेज केलं. तर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हे दोघं विभक्त झाले.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अरुण म्हणाला, “मी डिसेंबर 2024 मध्ये पत्नीपासून विभक्त झालो. वाईट लग्नामुळे मी बराच संघर्ष करत होतो आणि कोणत्याच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करू शकत नव्हतो. मी नैराश्यात होतो. पण सुदैवाने कुटुंबीयांच्या मदतीने आणि देवाच्या कृपेने त्यातून बाहेर पडलो. अतुल सुभाषने कोणत्या परिस्थितीचा सामना केला असेल हे मी पूर्णपणे समजू शकतो. वाईट लग्नात संघर्ष करणाऱ्या आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पुरुषांबद्दल मला खूप वाईट वाटतंय.” AI इंजीनिअर अतुल सुभाषने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आत्महत्या केली होती. अतुल सुभाषने व्हिडीओ आणि 24 पानांच्या सुसाइड नोटमध्ये त्याच्या पत्नी आणि सासारच्या लोकांविरोधात बरेच आरोप केले होते.
View this post on Instagram
अरुण त्याच्या घटस्फोटाविषयी पुढे म्हणाला, “अशा परिस्थितीचा सामना करताना एक वेळ अशी येते तेव्हा तुम्ही आयुष्यातील सर्वकाही गोष्टी सोडून द्यायला तयार असता. तुम्हाला कोणतीच आशा दिसत नाही. पण मी लोकांना सांगू इच्छितो की हार मानू नका. अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ होतोच. प्रत्येकाच्या आयुष्यात उजेड येतोच. आयुष्य ही देवाची देणगी आहे, त्याचा आदर करणं, त्यावर प्रेम करणं गरजेचं आहे. या घटनेतून मी अजूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. माझे कुटुंबीय माझी मदत करत आहेत. मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. कारण चुकीच्या निर्णयामुळे मी माझ्या करिअरमधील चार वर्षे गमावली आहेत.”