Samantha | समंथाशी घटस्फोटाबाबत नाग चैतन्यची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला “वाईट तेव्हा वाटतं जेव्हा..”
कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये जेव्हा समंथाने हजेरी लावली होती, तेव्हा घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया हा कडवटपणाचा अनुभव देणारा होता, असं ती म्हणाली होती. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाच समंथाला 'पुष्पा' या चित्रपटातील 'ऊ अंटावा' या आयटम साँगची ऑफर मिळाली होती.
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य सध्या त्याच्या आगामी ‘कस्टडी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत नाग चैतन्य त्याच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. लग्नाच्या चार वर्षांनंतर नाग चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने घटस्फोट जाहीर केला होता. चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता. समंथा अनेकदा मुलाखतींमधून आणि सोशल मीडियावर तिच्या घटस्फोटाविषयी व्यक्त झाली. आता नाग चैतन्यने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
“आम्ही विभक्त होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत तर घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया वर्षभरापूर्वी पार पडली. कोर्टाने आमचा घटस्फोट मंजूर केला. आम्ही दोघं आपापल्या आयुष्यात पुढे गेलो आहोत. मला माझ्या आयुष्यातील त्या काळासाठी प्रचंड आदर आहे”, असं नाग चैतन्य म्हणाला. समंथासोबतच्या नात्याविषयी तो पुढे म्हणाला, “ती खूप प्रेमळ मुलगी आहे आणि तिने तिच्या आयुष्यात खुश राहावं हीच माझी इच्छा आहे. मात्र जेव्हा माध्यमांमध्ये चर्चा सुरू होतात, अफवा पसरवल्या जातात तेव्हा आम्हा दोघांमधील गोष्टी विचित्र होतात. लोकांच्या नजरेत मग एकमेकांविषयीचा आदर नाहीसा होतो. त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं.”
नाग चैतन्य आणि समंथाने मजिली, ये माया चेसावे आणि ऑटोनगर सूर्या यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. 2017 मध्ये गोव्यात या दोघांनी धूमधडाक्यात लग्न केलं होतं. तर ऑक्टोबर 2021 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांनी विभक्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. घटस्फोटानंतर समंथा एकटीच असून नाग चैतन्यचं नाव अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी जोडलं जात आहे.
View this post on Instagram
कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये जेव्हा समंथाने हजेरी लावली होती, तेव्हा घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया हा कडवटपणाचा अनुभव देणारा होता, असं ती म्हणाली होती. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाच समंथाला ‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ या आयटम साँगची ऑफर मिळाली होती. तेव्हा तिच्या निकटवर्तीयांनी आणि मित्रमैत्रिणींनी हा ऑफर नाकारण्याचा तिला सल्ला दिला होता. याविषयी एका मुलाखतीत समंथा म्हणाली, “मी का लपून बसावं, असा प्रश्न मला पडला. मी काहीच चुकीचं केलं नव्हतं. सर्व ट्रोलिंग, टीका-टिप्पणी आणि द्वेष शांत झाल्यानंतर मी हळूहळू डोकं वर काढावं, जणू मी काही गुन्हाच केला होता, हे सर्व मला पटणारं नव्हतं. त्यामुळे मी माझं काम करत राहणार होते. मी माझ्या लग्नाला 100 टक्के दिले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यासाठी मी स्वत:ला दोषी ठरवू शकत नव्हते. जे मी केलंच नाही त्यासाठी स्वत:च्या मनात अपराधीपणाची भावना आणणार नव्हते.”