हीच सोशल मीडियाची पॉवर.. अखेर नागार्जुन यांनी ‘त्या’ चाहत्याची भेट घेत काढला फोटो
तेलुगू सुपरस्टार नागार्जुन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यामध्ये त्यांच्या बॉडीगार्डने एका चाहत्याला अत्यंत वाईट पद्धतीने बाजूला ढकलल्याचं दिसून आलं होतं. त्यावरून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आता नागार्जुन यांनी त्या चाहत्याची भेट घेतली.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नागार्जुनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एअरपोर्टवर नागार्जुनच्या दिशेने येणाऱ्या एका चाहत्याला त्यांचा बॉडीगार्ड अत्यंत वाईट पद्धतीने बाजूला ढकलताना दिसतोय. यावेळी नागार्जुन दुसरीकडे पाहत असतात. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. या घटनेनंतर बुधवारी नागार्जुन पुन्हा एकदा मुंबई एअरपोर्टवर दिसले. यावेळी त्यांनी त्याच चाहत्याची भेट घेतली आणि त्याच्यासोबत फोटोसाठी पोझसुद्धा दिला. यावेळी चाहत्याने नागार्जुन यांची माफी मागितली असता ते म्हणाले, “अरे, माफी नको मागूस. यात तुझी चूक नव्हती, माझी होती.” विमानात बसण्याआधी नागार्जुन यांनी इतर काही चाहत्यांचीही भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटो क्लिक केले.
नेमकं काय घडलं होतं?
वीकेंडला नागार्जुन एअरपोर्टवर त्यांच्या बॉडीगार्डसोबत चालत होते. यावेळी त्यांच्या आजूबाजूला लोकांना बराच घोळका केला होता. इतक्यात एक चाहता नागार्जुन यांच्या दिशेने येतो. तेव्हा त्यांचा बॉडीगार्ड त्या चाहत्याला पकडून बाजूला करतो. बॉडीगार्डने चाहत्याला दिलेली ही वाईट वागणूक पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला. व्हायरल व्हिडीओवर त्यांनी प्रतिक्रिया देत नागार्जुन यांना खूप ट्रोल केलं. बॉडीगार्डच्या त्या वागण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी नागार्जुन यांच्यावर केला.
View this post on Instagram
हा व्हिडीओ व्हायरल होताच नागार्जुन यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून संबंधित चाहत्याची माफी मागितली. त्या व्हिडीओवर नागार्जुन यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘ही गोष्ट माझ्या आता निदर्शनास आली. हे असं व्हायला पाहिजे नव्हतं. मी त्या व्यक्तीची माफी मागतो आणि भविष्यात असं काही घडणार नाही याची पूर्ण काळजी घेईन.’
नागार्जुन हे त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त मुंबईला आले होते. या चित्रपटात ते धनुषसोबत काम करत आहेत. ‘D51’ असं या चित्रपटाचं नाव असून शेखर कम्मुला याचं दिग्दर्शन करत आहेत. यामध्ये रश्मिका मंदानाचीही भूमिका आहे. याआधी अभिनेता धनुषचे बॉडीगार्डसुद्धा चाहत्यांना बाजूला ढकलताना दिसले. मात्र त्यावर धनुषने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.