चाहत्याला कानाखाली मारल्याचं प्रकरण नाना पाटेकरांना भोवणार? गोविंदाप्रमाणेच भरावा लागेल दंड?
नाना पाटेकर यांना इतका राग आला की त्यांनी सर्वांसमोर एका चाहत्याच्या कानशिलात लगावली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नाना यांचं हे वागणं पाहून नेटकरी त्यांच्यावर नाराज झाले आहेत. नानांचं हे वागणं बरोबर नाही, असं अनेकांनी म्हटलंय.
मुंबई : 15 नोव्हेंबर 2023 | अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नानांच्या जवळ एक चाहता सेल्फी क्लिक करण्यासाठी येतो. त्याचवेळी शूटिंगमध्ये असलेले नाना रागाच्या भरात त्याला डोक्यावर मारतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नानांचं हे वागणं बरोबर नाही, अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत. फक्त नानाच नाही, तर याआधी असेच काही कलाकार चाहत्यांवर हात उचलल्यामुळे चर्चेत आले होते. यामुळे त्यांना कायदेशीर बाबींनाही सामोरं जावं लागलं होतं. 2008 मध्ये अभिनेता गोविंदासोबत अशीच घटना घडली होती.
नाना पाटेकरांचं नेमकं प्रकरण काय?
व्हायरल व्हिडीओमध्ये नाना पाटेकर रस्त्यावर शूटिंगसाठी उभे असल्याचं पहायला मिळत आहे. त्यांच्या आजूबाजूला बरीच लोकंसुद्धा आहेत. अशातच एक चाहता त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी येतो. तेव्हा नानांचा पारा चढतो आणि ते त्याच्या डोक्यावर मारतात. त्यानंतर बाजूला उभा असलेला चित्रपटाच्या युनिटमधील एक व्यक्ती त्या चाहत्याला बाजूला नेतो. वाराणसीमध्ये ‘जर्नी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली. संबंधित चाहत्याने शूटिंगदरम्यान व्यत्यय आणला म्हणून नानांना राग अनावर झाला, असं काही जण म्हणाले. तर नाना यांनी त्याला मारायला पाहिजे नव्हतं, असंही काहीजण म्हणत आहेत.
चाहत्याला मारल्याने गोविंदाला 5 लाख रुपयांचा दंड
2008 मध्ये अभिनेता गोविंदा अशाच एका प्रकरणात अडकला होता. संतोष बातेश्वर राय नावाच्या एका चाहत्याला गोविंदाने ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटाच्या सेटवर मारलं होतं. मुंबईतील फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. या घटनेनंतर संतोषने गोविंदाविरोधात फेब्रुवारी 2009 मध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र या तक्रारीवर पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचं म्हणत त्याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने संतोषची याचिका फेटाळली. त्यानंतरही हार न मानता त्याने सुप्रिम कोर्टात दाद मागितली. 2017 मध्ये सुप्रिम कोर्टाने संतोषच्या बाजूने निकाल दिला. कोर्टाने गोविंदाला संतोषची माफी मागण्याचे निर्देश दिले आणि त्याचसोबत त्याला भरपाई म्हणून 5 लाख रुपये देण्याचे आदेश दिले.
नाना पाटेकरांवर कारवाई होणार का?
नानांनी ज्या चाहत्यावर हात उचलला त्याने अद्याप तक्रार दाखल केली का, याबद्दलची कोणतीच माहिती समोर आली नाही. पण गोविंदाच्या घटनेतही चाहता संतोषने घटनेच्या जवळपास वर्षभरानंतर तक्रार दाखल केली होती. त्यामुळे जरी चाहत्याने उशिरा एफआयआर दाखल केली, तरी नानांसाठी ती डोकेदुखी ठरू शकते. भारतीय दंड संहितेनुसार, एखाद्याच्या कानाखाली मारणे किंवा हात उचलणे हा अपराध मानला जातो. आयपीसीच्या कलम 352 नुसार हा दंडनीय गुन्हा आहे. या कलमांतर्गत आरोप केल्यास नाना पाटेकर यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा 500 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. संबंधित चाहत्याने मानहानीचा दावा केल्यास नुकसान भरपाईचा दंड अधिक वाढू शकतो.
नाना यांना कायदेशीर बाबींना सामोरं जावं लागेल की नाही, हे सर्व संबंधित चाहत्याच्या तक्रारीवर अवलंबून असेल. मात्र अद्याप घडलेल्या घटनेवर नानांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.