नाना पाटेकरांच्या चित्रपटाचा ओटीटीवर बोलबाला; भारतात नंबर 1 वर होतोय ट्रेंड
वयाच्या 74 व्या वर्षीही ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. गेल्या वर्षी त्यांचा एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता ओटीटीवर त्याच चित्रपटाचा बोलबाला पहायला मिळत आहे.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अभिनयकौशल्याविषयी वेगळं काही सांगायची गरज नाही. वयाच्या 74 व्या वर्षीही ते प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडण्यात यशस्वी ठरत आहेत. गेल्या वर्षी त्यांचा एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत हा चित्रपट फ्लॉप ठरला होता, मात्र आता ओटीटीवर त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. नाना पाटेकर यांच्या या चित्रपटाचं नाव आहे ‘वनवास’. 2024 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट पूर्णपणे फॅमिली ड्रामा आहे. यामध्ये ‘गदर’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात राजपाल यादव, सतेंद्र सोनी, पारितोष त्रिपाठी, श्रुती मराठे, सिमतर कौर आणि इतरही कलाकारांच्या भूमिका आहेत.
‘वनवास’ या चित्रपटात नाना पाटेकरांनी दीपक त्यागीची भूमिका साकारली आहे. दीपक हे त्यांच्या तीन विवाहित मुलांसोबत राहत असतात. त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे. अशातच त्यांची तीन मुलं त्यांना घर विकायला सांगतात. मात्र दीपक तसं करण्यास थेट मनाई करतात. कारण त्या घराशी त्यांच्या पत्नीच्या असंख्य आठवणी जोडलेल्या आहेत. दीपक त्यागी यांना विसरण्याचा आजार असतो. याचाच फायदा घेत त्यांची मुलं त्यांना वाराणसीमध्ये सोडून देतात. घरी परतल्यानंतर ते सर्वांना सांगतात की त्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. तर दुसरीकडे दीपक यांना त्यांच्या घराचा पत्ता लक्षात राहत नाही आणि वाराणसीमध्ये ते अडचणीत सापडतात. यानंतर कथेत रंजक वळण येतं. हा फॅमिली ड्रामा तितकाच भावूक करणाराही आहे.




View this post on Instagram
नाना पाटेकर यांचा ‘वनवास’ हा चित्रपट 14 मार्च रोजी झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. थिएटरमध्ये जरी याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नसला तरी ओटीटीवर प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट भारताच्या टॉप 10 चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. 2 तास 33 मिनिटांच्या या चित्रपटाला ओटीटीवर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात नाना पाटेकरांसोबत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता उत्कर्ष शर्माने याआधी ‘गदर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. ‘गदर 1’मध्येही त्याने चिमुकल्या मुलाची भूमिका साकारली होती.