प्रसिद्ध अभिनेत्याने स्टेजवरच अभिनेत्रीला ढकललं; व्हिडीओवर नेटकऱ्यांचा तीव्र संताप
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे कलाकार नंदमुरी बालकृष्ण हे त्यांच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. या व्हिडीओमुळे त्यांच्यावर बरीच टीका होतेय. बालकृष्ण हे एका कार्यक्रमात स्टेजवर असलेल्या अभिनेत्रीला सर्वांसमोर ढकलतात.
प्रसिद्ध तेलुगू अभिनेते आणि राजकारणी नंदमुरी बालकृष्ण यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या व्हिडीओमध्ये नंदमुरी बालकृष्ण हे स्टेजवर अभिनेत्री अंजलीला रागात ढकलताना दिसत आहेत. अंजलीच्या आगामी ‘गँग्स ऑफ गोदावरी’ या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये बालकृष्ण यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. स्टेजवर जेव्हा ते आले, तेव्हा त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या अंजलीला सरकरण्यास सांगितलं होतं. त्यानंतर अंजली थोडी सरकते, पण इतक्यात बालकृष्ण रागाने तिला ढकलतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अंजली आणि बालकृष्ण यांच्यामध्ये अभिनेत्री नेहा उभी असते. अंजलीला ढकलल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य सहज दिसून येतंय. मात्र अंजली जोरात हसते आणि बाजूला सरकते. यावेळी मंचावर मागे उभे असलेले इतर काहीजणसुद्धा बालकृष्ण यांच्या या कृत्यावर हसतात. बालकृष्ण यांनी अंजलीला मस्करीच ढकललं की रागाच हे मात्र स्पष्ट झालं नाही. मात्र या व्हिडीओवरून अनेकांनी राग व्यक्त केला आहे. थोड्या वेळानंतर त्याच कार्यक्रमात बालकृष्ण हे अंजलीला ‘हाय फाइव्ह’ देताना दिसले.
बालकृष्ण हे ज्येष्ठ कलाकार असल्याने अंजलीने ती गोष्ट हसण्यावारी घेतली. मात्र नेटकऱ्यांना त्यांचं हे वागणं अजिबात पसंत पडलं नाही. महिलांप्रती त्यांची ही वागणूक अत्यंत अपमानास्पद होती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. ‘बालकृष्ण हे असेच आहेत, असं म्हणून त्यांच्या या कृत्यावर पडदा टाकणं योग्य नाही. हे चुकीचं आहे’, असं एकाने म्हटलं. तर ‘एका प्रतिभावान अभिनेत्रीला सर्वांसमोर अशी वागणूक देणं अपमानास्पद आहे’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे.
— Out of Context Telugu (@OutOfContextTel) May 29, 2024
बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांनीसुद्धा बालकृष्ण यांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोण आहे हा लबाड माणूस?’, अशी संतापजनक कमेंट त्यांनी या व्हिडीओवर केली आहे. बालकृष्ण यांचा स्वभावच तसा आहे, असं म्हणत काही नेटकऱ्यांनी त्यांचं समर्थन केलं. अशा नेटकऱ्यांच्या कमेंटवर हंसल मेहता यांनी लिहिलं, ‘लबाड x100.’
बालकृष्ण यांचे सहकलाकार अनेकदा त्यांच्या तापट स्वभावाविषयी व्यक्त झाले आहेत. ‘जय सिम्हा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक के. एस. रवीकुमार पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, “बालकृष्ण यांना लगेच राग येतो. पंख्याच्या हवेनं जेव्हा बालकृष्ण यांचा विग डोक्यावरून थोडा सरकला, तेव्हा सहाय्यक दिग्दर्शक यांना हसू आलं होतं. ते पाहून चिडलेले बालकृष्ण हे त्याला मारायला निघाले होते. त्यात अखेर मला मध्यस्थी करून त्यांना शांत करावं लागलं होतं.”