Adipurush: लेदरच्या कपड्यांमध्ये हनुमान; ‘आदिपुरुष’च्या टीझरवर भडकले मंत्री
"चित्रपटातील वादग्रस्त दृश्ये हटवा अन्यथा.."; मंत्र्यांनी निर्माते-दिग्दर्शकांना दिला इशारा
मुंबई- ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्यातील अनेक छोट्या-मोठ्या बाबींवरून नेटकऱ्यांनी आक्षेप नोंदविला आहे. आता मध्यप्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी आदिपुरुषच्या टीझरवरून (Adipurush Teaser) प्रश्न उपस्थित केला आहे. या टीझरमधील काही वादग्रस्त दृश्ये हटविली जावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर ही दृश्ये हटविली नाहीत तर निर्माते-दिग्दर्शकांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
2 ऑक्टोबर रोजी अयोध्येत आदिपुरुषचा टीझर धूमधडाक्यात लाँच करण्यात आला. मात्र टीझर पाहिल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांकडून बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आधी फक्त सोशल मीडियावर या टीझरची खिल्ली उडवली गेली. आता मंत्र्यांनीच याबद्दल इशारा दिला आहे.
There are objectional scenes in teaser. Lord Hanuman is shown wearing clothes of leather. Such scenes hurt religious sentiments. I am writing to producer Om Raut to remove such scenes. If he doesn’t remove, we’ll think about legal action: MP Home Min on #Adipurush movie teaser pic.twitter.com/Z4AbUo9MxE
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) October 4, 2022
“आदिपुरुषच्या टीझरमध्ये अनेक वादग्रस्त सीन्स आहेत. हनुमानाला लेदरच्या कपड्यांमध्ये दाखवलं गेलंय. अशा प्रकारच्या दृश्यांनी धार्मिक भावना दुखावल्या जातात. मी दिग्दर्शक ओम राऊत यांना पत्र लिहिणार आहे. या दृश्यांना चित्रपटांकडून काढून टाकण्याची मागणी करतोय. जर अशी दृश्ये हटवली गेली नाहीत तर आम्ही कायदेशीर कारवाईचा विचार करू”, असं वक्तव्य डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी केलंय.
‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणाच्या कथेवर आधारित आहे. यामध्ये प्रभास हा राम, सैफ अली खान हा रावण आणि कृती सनॉन ही सीतेच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता देवदत्त नागे हा हनुमानाची भूमिका साकारतोय.