National Film Awards: अजय देवगण, सूर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण
मुंबई- 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं (National Film Awards) वितरण पार पडलं. चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि नामवंत कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मनोरंजनविश्वातील विविध विभागांमध्ये हे पुरस्कार दिले गेले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि साऊथ सुपरस्टार सूर्याला (Suriya) मिळाला. अजयला ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’साठी तर सूर्याला ‘सूराराई पोट्रू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण पार पडलं.
राष्ट्रीय पुरस्कार वितरणाची सुरुवात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शकापासून झाली. सर्व पुरस्कारांचं वितरण झाल्यानंतर साऊथ आणि बॉलिवूडच्या या दोन अभिनेत्यांना पुरस्कार दिला गेला. सूर्याने पत्नी ज्योतिकासोबत या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. त्याच्या करिअरमधील हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे.
Superstar #AjayDevgn Receiving #nationalaward For best actor pic.twitter.com/5PsvYcem7S
— Sunita (@sunitaADFan) September 30, 2022
सूराराई पोट्रू या चित्रपटाची अभिनेत्री अपर्णा बालमुरली हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही सूर्याच्या याच चित्रपटाला दिला गेला.
विशाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘1232 किलोमीटर मरेंगे तो वहीं जाकर’साठी विशाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दिग्दर्शक मधुर भांडारकर, अभिनेत्री पूनम ढिल्लन यांनीसुद्धा या पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी लावली होती.
सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘जस्टिस डिलेड बट डिलिव्हर्ड’ आणि थ्री सिस्टर्स यांना मिळाला. दिग्दर्शक शांतनू रोडे यांच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.