अखेर तो क्षण आलाच.. ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजे देणार प्रेमाची जाहीर कबुली?
'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत वल्लरी विराज आणि राकेश बापट यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेत अखेर तो क्षण आलाच.. ज्याची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते.
झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत नवीन वर्षात नवीन धमाके होणार आहेत, ज्याची सुरुवात जहागीरदारांच्या न्यू इयर पार्टीने सुरू झाली आहे. एजेला अखेर जाणीव झाली आहे की त्याचं लीलावर प्रेम आहे. लीला एजेसाठी चहा बनवत असताना दुर्गा येऊन एजेची चहा बनवायची पद्धत वेगळी असल्याचं लीलाला सांगते. लीला तिचं न ऐकता स्वतःच्या पद्धतीने चहा बनवून एजेला देते. एजे चहा पिताना लीला म्हणते, “तुम्ही माझं हृदय जिंकलंय, आता माझ्यासाठी काहीतरी खास करा.” हे सर्व पाहून दुर्गाला राग येतो. एजे विश्वाला कल्पना विचारण्यासाठी कॉल करतो, पण त्याच्या सर्व कल्पना तो नाकारतो. स्वत:ची युक्ती लढवत एजे त्याच्या खोलीत पांढऱ्या गुलाबांच्या बुकेसह उभा राहतो. हे पाहून लीला खूप खुश होते.
एजे दुर्गाला एक साधी घरगुती नववर्ष पार्टी आयोजित करण्याची सूचना देतो, ज्यामुळे दुर्गा आश्चर्यचकित होते. विश्वरूप दुर्गाला सांगतो की एजेला कोणालातरी “आय लव्ह यू” म्हणायचं आहे, जे ऐकून दुर्गा असं कधीच होणार नाही असं म्हणते. लक्ष्मी आणि सरस्वती लीलाला पार्टीबद्दल चुकीची माहिती देतात. एजे आणि सुनाही पार्टीसाठी तयार होतात. सर्वजण लीलाला उशिर होणार हे गृहीत धरतात. एजे सर्वांना सांगतो की जरी लीला उशीरा आली तरी, ती परफेक्ट दिसेल. लाइट्स गेल्यावर लीला एकदम वेगळ्या आणि विचित्र पोशाखात स्पॉटलाइटमध्ये येते. सर्वजण तिच्या दिसण्यावर हसू लागतात. नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये एजे लीलाला हटके पद्धतीने प्रपोज करणार आहे.
View this post on Instagram
या धमाकेदार एपिसोडबद्दल लीलाची भूमिका साकारत असलेली वल्लरी विराज म्हणते, “लीला एक फिल्मी कॅरेक्टर म्हणून तयार होऊन येते. ती अशी का आणि कशी तयार होऊन येते हे तुम्हाला एपिसोडमध्ये सविस्तर पाहायला जास्त मज्जा येईल. लीलाचा हा जो लूक आहे, तो एका चित्रपटातील आहे आणि हाच लूक का याच्याही मागचं एक कारण आहे. आम्ही या लूकसाठी खूप लूक टेस्ट केल्या आणि मग जाऊन हा लूक फायनल केला. या लूकमध्ये मला आधी कसं तरी वाटलं, कारण लीला नेहमी गोड आणि छान तयार होते,” असं ती म्हणाली.
“दिग्दर्शकानी मला या लूकमागची कल्पना समजावून सांगितली, त्याचा कसा कथा आणि लीलाच्या भूमिकेला फायदा होणार हे सांगितलं. त्यानंतर सगळं व्यवस्थित झालं. माझा लूक पाहून टीमला खूप हसू येत होतं. पण मी नर्वस होईन या भीतीने कोणी हसलं नाही. एक अभिनेत्री म्हणून मला हे शिकायला मिळालं की आपल्या लूकबद्दल विचार न करता काम करता आलं पाहिजे. प्रेक्षकांना हा सीन पाहायला नक्कीच आवडेल. यात एजेची प्रतिक्रियाही मनोरंजक असेल. कारण आता तो लीलाच्या प्रेमात पडला आहे”, अशा शब्दांत वल्लरी व्यक्त झाली.