‘नवरी मिळे हिटलरला’ फेम एजेच्या पूर्व पत्नीचं अरुण जेटलींशी खास कनेक्शन; जाणून घ्या..
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत एजेची भूमिका साकारणारा अभिनेता राकेश बापट खऱ्या आयुष्यात घटस्फोटित आहे. अभिनेत्री रिधी डोग्राशी त्याने लग्न केलं होतं. लग्नाच्या सात वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एजेच्या भूमिकेसाठी अभिनेता राकेश बापटला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. या मालिकेत एजे आणि लीलाची जोडी चाहत्यांना खूपच आवडतेय. या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे ही मालिका लोकप्रिय ठरतेय. राकेशचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. राकेशने अभिनेत्री रिधी डोग्राशी लग्न केलं होतं. ‘मर्यादा’ या मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. राकेशप्रमाणेच रिधीसुद्धा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. टीव्हीनंतर तिने वेब सीरिज आणि चित्रपटांकडेही आपला मोर्चा वळवला. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
रिधी डोग्राविषयी सांगायचं झाल्यास, तिचं एका दिवंगत नेत्याशी खास कनेक्शन आहे. भाजपचे दिवंगत नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची ती भाची आहे. 2019 मध्ये त्यांच्या निधनानंतर रिधीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली होती. ‘त्यांच्या निधनाने देशाचं खूप मोठं नुकसान तर झालंच आहे. पण आमच्या कुटुंबासाठी हे नुकसान अधिक खोलवर झालेलं आहे. ही कधीही भरून न येणारी पोकळी आहे. मी त्यांच्या आणि बुवाजींच्या अवतीभवतीच मोठी झाले. ते वकील असताना मी सोनाली आणि रोहनसोबत त्यांच्या ऑफिसमध्ये खूप वेळा खेळले. आमचं आयुष्य कसं चाललंय आणि आम्ही आमच्या भविष्याकडे कसं पाहतो, याविषयी ते नेहमी आपुलकीने जाणून घ्यायचे’, असं रिधीने लिहिलं होतं.
View this post on Instagram
‘बेटा, तुझं काम कसं सुरू आहे? सध्या इंडस्ट्रीत नवीन काय सुरू आहे? ते नेहमी मला विचारायचे. त्यांना उत्तर देताना नेहमी माझे शब्द अपुरे पडायचे. कारण माझ्या इंडस्ट्रीबद्दल काही गोष्टी ज्य़ा मलाही माहित नसतील ते त्यांना माहित असेल याची मला खात्री होती. पण तरीही ते प्रत्येकाला महत्त्व देऊन त्यांच्याविषयी विचारायचे’, अशा शब्दांत ती व्यक्त झाली होती.
View this post on Instagram
रिधी आणि राकेश यांची जोडी ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. त्यामुळे जेव्हा या दोघांनी घटस्फोट जाहीर केला, तेव्हा चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. या दोघांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. लग्नानंतर रिधी आणि राकेश यांनी त्यांच्यात मैत्रीचं नातं कायम ठेवलं आहे.