मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी गेल्या काही काळापासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. आता पत्नी आलियासोबतचा त्याचा वाद संपुष्टात आल्याचं कळतंय. दोघं एकमेकांच्या चुका विसरून पुन्हा नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेत. तर दुसरीकडे नवाजुद्दीनचा ‘जोगिरा सारा रा रा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो सहअभिनेत्री नेहा शर्मासोबत या चित्रपटाचं प्रमोशन करत होता. याच प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्याला ‘द केरळ स्टोरी’वरील बंदीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या चित्रपटाबाबत नवाजुद्दीनचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता नवाजुद्दीनने ट्विट करत राग व्यक्त केला आहे.
निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपने ‘द केरळ स्टोरी’च्या बंदीवरून एक ट्विट केलं होतं. ‘तुम्ही चित्रपटाशी सहमत असो किंवा नसो, तो चित्रपट प्रचारकी असो किंवा नसो, आक्षेपार्ह असो किंवा नसो, त्या चित्रपटावर बंदी आणणं हे चुकीचंच आहे’, असं त्याने लिहिलं होतं. या ट्विटवरून नवाजुद्दीन सिद्दिकीला प्रश्न विचारला असता त्यानेही अनुरागच्या मताशी सहमती दर्शविली. मात्र पुढे तो म्हणाला, “एखादा चित्रपट किंवा कादंबरी जर काही लोकांच्या भावना दुखावत असेल तर हे चुकीचं आहे. आम्ही प्रेक्षकांना किंवा त्यांच्या भावना दुखावण्यासाठी चित्रपट बनवत नाही. जर चित्रपटात लोकांमध्ये दरी निर्माण करण्याची आणि सामाजिक समरसता तोडण्याची ताकद असेल तर हे खूपच चुकीचं आहे. आपल्याला या जगाला जोडायचं आहे, तोडायचं नाही.”
Please stop spreading false news just to get some views and hits, it’s called cheap TRP – I never said and I would never want any film to be banned ever.
STOP BANNING FILMS.
STOP SPREADING FAKE NEWS !!!— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) May 26, 2023
नवाजुद्दीनच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा झाली. काहींनी नवाजुद्दीनच्या वक्तव्यावर टीकासुद्धा केली होती. त्यानंतर आता त्याने ट्विट करत राग व्यक्त केला आहे. ‘फक्त काही व्ह्यूज आणि हिट्स मिळवण्यासाठी कृपया खोटी बातमी पसरवणं थांबवा. याला ‘चीप टीआरपी’ (स्वस्तात मिळवलेली प्रसिद्धी) म्हणतात. कोणत्याही चित्रपटावर कधीही बंदी आणली जावी असं मी म्हणालोच नाही. चित्रपटांवर बंदी आणणं थांबवा, खोट्या बातम्या पसरवणं थांबवा’, असं त्याने स्पष्ट केलं.
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, सिद्धी इदनानी, योगिता बिहानी आणि सोनिया बलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल याठिकाणी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.