मुंबई: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची आई मेहरुनिसा सिद्दिकी यांनी त्यांची सून आलिया सिद्दिकीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसांनी आलियाला चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. मेहरुनिसा यांच्या तक्रारीनंतर आयपीसीच्या 452, 323, 504 आणि 506 या कलमांतर्गत पोलिसांनी एफआयआर दाखल केली. नवाजुद्दीनची आई आणि त्याच्या पत्नीमध्ये संपत्तीवरूनही वाद सुरू आहे. आलियाने इन्स्टाग्रामवर तक्रारीचा फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
‘धक्कादायक.. माझ्या पतीविरोधात जेव्हा मी गुन्हेगारी तक्रार केली, तेव्हा पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र मी माझ्या पतीच्या घरात पाऊल ठेवताच काही तासांनी माझ्याविरोधात गुन्हेगारी तक्रार दाखल करण्यात आली. अशा पद्धतीने मला कधी न्याय मिळू शकेल का’, असा सवाल तिने या पोस्टद्वारे केला.
आलिया आणि नवाजुद्दीनने 2010 मध्ये लग्न केलं. या दोघांना दोन मुलं आहेत. 6 मे 2020 रोजी आलियाने नवाजुद्दीनला घटस्फोट देण्यासाठी अर्ज केला. मात्र नंतर 2021 मध्ये तिने तो अर्ज मागे घेतला. 2020 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते.
“मला नीट आठवतंय, आम्ही जेव्हा एकमेकांना डेट करत होतो आणि लग्नाचा निर्णय घेतला होता, तेव्हासुद्धा तो दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. लग्नाआधी आणि लग्नानंतरही आमच्यात खूप भांडणं झाली. मी जेव्हा गरोदर होते, तेव्हा मलाच स्वत:ची सर्व काळजी घ्यावी लागली होती. माझ्या डिलिव्हरीच्या वेळीही तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फोनवर बोलत होता. फोनबिल्सवरील माहितीमुळे मला हे सर्व समजलं”, असं ती म्हणाली होती.
नंतर कोविडदरम्यान नवाजुद्दीनने मुलांची आणि तिची काळजी घेतल्याने आलियाने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. “मला कोविडची लागण झाली होती. त्यावेळी नवाजुद्दीनने फक्त मुलांची नाही तर माझी पण काळजी घेतली. मी त्याच्याविषयी जे काही म्हणाले, त्यानंतरही त्याने माझी मदत केली. कोरोना महामारीमुळे माझे डोळे उघडले”, अशी कबुली आलियाने दिली होती.