Nawazuddin Siddiqui यांच्या पत्नीवर होत आहेत सासरी अत्याचार? वकिलांकडून अभिनेत्यावर गंभीर आरोप
Nawazuddin Siddiqui यांच्या पत्नीच्या वकिलांकडून अभिनेत्यावर गंभीर आरोप; 'गेल्या सात दिवसांपासून जेवण आणि बाथरुम...'; अभिनेत्याच्या अडचणीत होणार वाढ?
मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने आतापर्यंत अनेक हीट सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्याच्या अभिनयाचं देखील सर्वत्र कौतुक होत असतं. नवाजुद्दीन सिद्दीकी याचं प्रोफेशनल आयुष्य यशस्वी आहे, तर दुसरीकडे अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. गेल्या काही दिसांपासून अभिनेत्याच्या खासगी आयुष्यात अनेक उतार-चढाव दिसून येत आहेत. अशात नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया हिच्या वकिलांनी अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या आठवड्यापासून नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबियांनी आलिया हिला जेवण, झोपण्यासाठी बेड आणि बाथरुम न दिल्याचे आरोप आलिया हिच्या वकिलांनी केले आहेत.
याप्रकरणी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सर्वप्रथम नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईने अभिनेत्याची पत्नी आलिया हिच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर आलिया हिने पती नवाजुद्दीन सिद्दीकीवर गंभीर आरोप केले आहेत. आता आलिया हिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी सांगितलं की, ‘नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आलिया घरा बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न केले.’
‘सर्वप्रथम आलिया विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून अटकेची धमकी दिली. आता आलियावर अत्याचार करत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्यांच्या कुटुंबियांनी गेल्या सात दिवसांपासून आलिया यांना जेवण देखील दिलेलं नाही. एवढंच नाही तर, आलिया यांना झोपण्यासाठी बेड आणि बाथरुम देखील दिला जात नाही.’
वकील रिझवान सिद्दीकी पुढे म्हणाले, ‘आलिया यांच्या खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. शिवाय खोली बाहेर २४ तास बॉडीगार्ड तैनात असतात. गेल्या कित्येत दिवसांपासून आलियाला मला भेटू देखील दिलं नाही. पण मी आणि माझ्या टीमने आलिया यांची भेट घेतली आणि त्यांची सही घेतली आहे. आता आम्ही नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल करू शकतो..’ अशी माहिती वकील रिझवान सिद्दीकी यांनी दिली आहे. सध्या आलिया नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या अंधेरी येथील घरी राहत आहेत.