‘अशा पद्धतीने नीच वागून..’; भडकलेल्या नयनताराचं धनुषला खुलं पत्र
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराच्या आयुष्य आणि करिअरवर आधारित माहितीपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वी तिने अभिनेता आणि निर्माता धनुषला खुलं पत्र लिहिलं आहे.
अभिनेत्री नयनताराच्या आयुष्यावर आणि प्रेमकहाणीवर आधारित एक डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. मात्र त्यापूर्वीच अभिनेता आणि निर्माता धनुषने तिला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस बजावली आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नानुम रावडी धान’ या चित्रपटातील काही गाणी आणि व्हिडीओ आपल्या डॉक्युमेंट्रीमध्ये वापरण्यास परवानगी द्यावी, यासाठी नयनताराला धनुषला विनंती करत होती. मात्र दोन वर्षांपर्यंत धनुषने त्यावर कोणतंच उत्तर दिलं नाही. अखेर तिने खासगी मोबाइलमध्ये शूट केलेला सेटवरील तीन सेकंदांचा व्हिडीओ वापरला. त्यावरूनच धनुषने तिला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटिशीनंतर नयनताराच्या संयमाचा बांध सुटला आणि तिने सोशल मीडियावर खुलं पत्र लिहित धनुषला चांगलंच सुनावलं आहे. या पत्रात तिने काय लिहिलंय, ते पहा..
नयनताराचं पत्र-
‘प्रिय धनुष.. अनेक चुकीच्या गोष्टी ठीक करण्यासाठी मी हे खुलं पत्र लिहित आहे. तुझ्यासारखा प्रस्थापित नट.. जो वडिलांच्या आणि भावाच्या पाठिंब्याने, आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचला आहे, त्याने हे वाचण्याची आणि समजून घेण्याची खूप आवश्यकता आहे. सिनेमा हा माझ्यासारख्या लोकांसाठी जगण्याचा एक लढा आहे हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. इंडस्ट्रीत कोणाशीही कनेक्शन नसताना मी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि संघर्ष करत इथवर पोहोचले.
नेटफ्लिक्सवरील माझ्या माहितीपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा माझ्यासह असंख्य चाहते आणि शुभचिंतक करत आहेत. बऱ्याच अडचणींनंतर संपूर्ण टीम आणि इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींच्या मदतीने हा माहितीपट पूर्ण झाला आहे. पण या माहितीपटाविरोधात, माझ्या आणि माझ्या जोडीदाराविरोधात तू जो सूड उगवला आहेस, त्याचा परिणाम फक्त आम्हालाच नाही तर या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या प्रत्येकाला भोगावा लागतोय. या माहितीपटात माझे, माझ्या आयुष्याचे, माझ्या प्रेमकहाणीचे, लग्नाचे, इंडस्ट्रीतील अनेक शुभचिंतकांचे अनेक क्लिप्स समाविष्ट आहेत. पण दुर्दैवाने यात माझ्या करिअरमधील सर्वांत खास आणि महत्त्वाच्या ‘नानुम रावडी धान’ या चित्रपटातील एकही क्लिप नाही.
एनओसीसाठी (ना हरकत प्रमाणपत्र) आणि आमच्या माहितीपटाच्या प्रदर्शनासाठी दोन वर्षे तुझ्याशी संघर्ष केल्यानंतर आणि तुझ्या मंजुरीची प्रतीक्षा केल्यानंतर अखेर आम्ही हार मानण्याचा निर्णय घेतला. अनेकदा विनंती करूनही तू ‘नानुम रावडी धान’ या चित्रपटातील गाणी, व्हिज्युअल कट्स आणि फोटोही वापरण्यास परवानगी नाकारली. यामुळे माझं मन दुखावलं गेलं. व्यवसायातील मजबुरी आणि आर्थिक समस्यांमुळे तू नकार दिल्यास मी समजून घेतलं असतं. पण तू फक्त आमच्याविरोधातील वैयक्तिक नाराजीमुळे परवानगी नाकारली आणि इतके दिवस जाणूनबुजून निर्णय कळवला नाही, हे समजल्यानंतर माझं मन खूप दुखावलंय.
या सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे या माहितीपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तू आम्हाला कायदेशीर नोटीस बजावलीस. या नोटिशीतील त्या ओळी वाचून आम्हाला धक्काच बसला, जिथे तू तीन सेकंदांच्या व्हिडीओच्या वापराबद्दल सवाल केलास. तो व्हिडीओ आमच्या खासगी उपकरणात शूट केला होता आणि पडद्यामागीत ती दृश्ये आधीच सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहेत. त्या तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी तू 10 कोटी रुपयांची मागणी केलीस. हे तुझं वागणं अत्यंत खालच्या पातळीचं असून तुझ्या चारित्र्याबद्दल ते स्पष्ट सांगतंय. तुझ्या निरागस चाहत्यांसमोर तू स्वत:ला जसं दाखवतोस, त्याचं अर्ध तरी तुझ्या वागणीतून दिसावं अशी माझी इच्छा आहे. पण हे स्पष्ट झालंय की तू जे दाखवतोस, तसं तू नाहीत. किमान माझ्या आणि माझ्या पार्टनरसाठी तरी नाहीस.
चित्रपटाचा निर्माता हा इतरांच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवणारा सम्राट बनतो का? सेटवरील सर्व व्यक्तींचं स्वातंत्र्य त्याच्या हाती येतं का? त्या सम्राटाच्या हुकूमाविरोधात गेल्यास कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागतं का?
तुझ्या कायदेशीर नोटिशीला आम्ही योग्य उत्तर देऊच. चित्रपटातील गाणी आणि व्हिडीओ वापरण्यास नकार देण्यामागील कॉपीराइट्सची कारणं योग्य असतील. पण तुला याची आठवण करून देऊ इच्छिते की या सगळ्याची एक नैतिक बाजूसुद्धा आहे, ज्याला देवाच्या कोर्टात तुला सामोरं जावं लागेल.
चित्रपट प्रदर्शित होऊन दहा वर्षे झाली आहेत आणि जगासमोर मुखवटा घालून अशा पद्धतीने नीच वागण्यासाठी हा काळ खूप मोठा आहे. निर्माता म्हणून तुझा सर्वांत हिट आणि सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रपटाबद्दल तू सांगितलेल्या सर्व भयानक गोष्टी मी विसरले नाही. प्री-रिलीजदरम्यान तू जे शब्द वापरलेस, त्यांनी माझ्या मनावर कायमचे व्रण सोडले आहेत. मला इंडस्ट्रीतून समजलं की हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाल्यानंतर तुझा अहंकार खूप दुखावला गेला. चित्रपटाच्या यशाबद्दल तुझी नाराजी ही पुरस्कार सोहळ्यांद्वारे सर्वसामान्यांनाही दिसत होती.’
View this post on Instagram
‘व्यावसायिक स्पर्धा बाजूला सारून कोणतीही प्रतिष्ठित व्यक्ती इतरांच्या खासगी आयुष्यात इतकी हानी पोहोचवत नाही. सौजन्य, शालीनता आणि मोठ्या मनाने वागणं या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. मला विश्वास आहे की तमिळनाडूमधील लोक किंवा विवेकबुद्धी असणारी कोणतीही व्यक्ती अशा अत्याचाराला दाद देणार नाही.
या पत्राद्वारे माझी एवढीच इच्छा आणि प्रार्थना आहे की तू तुझ्या भूतकाळात ओळखत असलेल्या काही लोकांच्या यशाबद्दल मनात शांती बाळगावी. हे जग खूप मोठं आहे आणि ते प्रत्येकासाठी आहे. तुझ्या ओळखीतले लोक यशस्वी ठरत असतील तरी ते ठीक आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य लोकांनी इतकं मोठं यश मिळवणं ठीक आहे. काही लोक इतरांशी चांगले संबंध जोडत असतील आणि आनंदी असतील तर ते ठीक आहे. यामुळे तुझ्याकडून काहीही हिरावलं जात नाही.
आता तू तुझ्या पुढच्या ऑडिओ लाँचदरम्यान काही खोट्या कथा बनवून आणि त्यात पंचलाइन्स समाविष्ट करून लोकांसमोर मांडू शकतोस. परंतु देव सर्वकाही पाहतोय. मला तुझ्या शब्दसंग्रहात एक जर्मन शब्द समाविष्ट करायचा आहे, ज्याला ‘schadenfreude’ (इतरांच्या दुर्दैवातून स्वत:ला आनंद किंवा समाधान मिळणे) असं म्हणतात. तू आमच्यासोबत किंवा कोणाशीही त्या भावनेचा आस्वाद घेणार नाहीस याची खात्री करून घे.
या जगात जिथे लोकांकडे तुच्छतेने पाहणं खूप सोपं आहे, तिथे इतरांच्या आनंदातही आनंद मानणारी, इतरांच्या कथांमधून आशा शोधणारी माणसं आहेत. आमच्या माहितीपटातून आम्हाला हेच दाखवायचं आहे. मी तुलाही ते पाहण्याचा सल्ला देईन. कदाचित त्यानंतर तुझं मत बदलू शकेल. प्रेम पसरवणं खूप महत्त्वाचं आहे. मी आशा आणि प्रार्थना करते की एखाद्या दिवसी तूदेखील ते फक्त बोलण्यास नाही तर करण्यासही पूर्णपणे सक्षम असशील,’ अशा शब्दांत तिने धनुषला सुनावलं आहे.