मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता मधू मंटेनाने गेल्या रविवारी गर्लफ्रेंड इरा त्रिवेदीशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर आयोजित केलेल्या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यामध्ये आमिर खान, अनिल कपूर, हृतिक रोशन, राकेश रोशन, अनुपम खेर, सोनाली बेंद्रे यांचा समावेश होता. आता लग्नानंतर मधू मंटेनाने मोठा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर मुलीचं आडनाव बदललं जातं किंवा आपल्या आडनावापुढे ती सासरचं आडनाव लावते. मात्र मधू मंटेनाने लग्नानंतर पत्नीचं आडनाव लावलं आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचं बदलेलं नाव पहायला मिळतंय. मधू मंटेना त्रिवेदी असा बदल त्यांनी आपल्या नावात केला आहे. तर दुसरीकडे इराचं आडनाव तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट आधीसारखंच आहे.
मधू मंटेनाने याआधी ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि फॅशन डिझायनरल मसाबा गुप्ताशी लग्न केलं होतं. 2015 मध्ये या दोघांनी लग्न केलं. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2019 मध्ये मधू मंटेना आणि मसाबा गुप्ता विभक्त झाले. मसाबाच्या आधी तो अभिनेत्री नंदना सेनसोबत रिलेशनशिपमध्ये होता. आता योग प्रशिक्षक आणि लेखिका इरा त्रिवेदीशी त्याने लग्न केलं आहे.
सोमवारी मधू मंटेनाने इरा त्रिवेदीसोबतचा लग्नातील खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘मी आता परिपूर्ण झालो. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी इतका खुश आणि समाधानी नव्हतो. मी जेव्हा इराला लग्नासाठी प्रपोज केलं तेव्हा ते शक्य नाही असं मला वाटलं होतं. पण काही ईश्वरी हस्तक्षेपानंतर अखेर हे लग्न शक्य झालं.’ मधू मंटेनाने लग्नाचा हा फोटो पोस्ट करताच त्यावर नीना गुप्ता यांनी कमेंट केली होती. ‘शुभेच्छा’ अशी कमेंट त्यांनी लिहिली होती.
मधू मंटेना 48 वर्षांचा असून त्याची पत्नी इरा त्रिवेदी ही त्याच्यापेक्षा वयाने नऊ वर्षांनी लहान आहे. “इराला पाहताच क्षणी मी तिच्याशी लग्न करणार असल्याचं ठरवलं होतं. पण लग्नाचा निर्णय घेण्यास इराने काही काळ घेतला. जर कोरोना महामारी नसती तर आतापर्यंत आमचं लग्न झालं असतं”, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.