मुंबई : अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त होतात. त्यांचा ‘लस्ट स्टोरीज 2’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. स्त्रियांच्या कामुक भावनेबद्दलच्या विविथ कथा यात आधुनिक दृष्टीकोनातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी त्यांच्या पहिल्या लिप-टू-लिप किसिंग सीनचा प्रसंग सांगितला. या किसिंग सीननंतर नीना यांच्या मनावर इतका परिणाम झाला होता की त्यांनी चक्क अँटिसेप्टिकने चूळ भरली होती. 1990 च्या सुरुवातीला जेव्हा ‘दिल्लगी’ या शोमध्ये त्या काम करत होत्या, तेव्हाची ही घटना आहे.
त्याकाळी छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर इंटिमेट आणि बोल्ड सीन्स दाखवणं सोपं नव्हतं. ‘दिल्लगी’ मालिकेच्या वाहिनीकडून जेव्हा किसिंग सीन असलेल्या एपिसोडचं प्रमोशन करण्यात आलं, तेव्हा त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. भारतीय टीव्ही इंडस्ट्रीच्या इतिहासातील पहिला ऑन कॅमेरा किसिंग सीन असल्याची जाहिरात त्यांनी केली होती. इनसाइड बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत नीना म्हणाल्या, “एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून तुम्हाला सगळे सीन्स करावे लागतात. कधीकधी तुम्हाला चिखलात पाय ठेवावा लागतो तर कधी तासनतास उन्हात उभं राहावं लागतं.”
किसिंग सीन आठवत नीना पुढे म्हणाल्या, “बऱ्याच वर्षांपूर्वी मी दिलीप धवन यांच्यासोबत एक मालिका केली होती. भारतीय टीव्हीच्या इतिहासातील पहिला लिप-टू-लिप किसिंग सीन त्यात होता. मी रात्रभर झोपू शकले नव्हते. दिलीप माझे मित्र नव्हते, पण आम्ही एकमेकांना ओळखत होतो. ते दिसायलाही हँडसम होते, पण अशा परिस्थितीत ही गोष्टसुद्धा महत्त्वाची नसते. कारण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी तयार नव्हते. मी खूप चिंतेत होते, पण अखेर स्वत:ला समजावलं की मला यातून जायचंच आहे.”
“काही लोक कॉमेडी करू शकत नाहीत, तर काही जण कॅमेरासमोर रडू शकत नाही, अशीच ही एक गोष्ट होती. तो सीन संपताच मी डेटॉलने चूळ भरली. ज्या व्यक्तीला मी चांगल्याप्रकारे ओळखत नाही, त्याला किस करणं खूप कठीण होतं. चॅनलकडून या सीनचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांच्यावर खूप टीका झाली. अखेर त्यांना हा सीन काढावा लागला. मी उत्सवमध्येही इंटिमेट सीन केला होता. तोसुद्धा खूप कठीण होता”, असं त्यांनी सांगितलं.