अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) लवकरच ‘अ थर्सडे’ (A Thursday) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती गरोदर पोलिसाची भूमिका साकारत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने चित्रपटातील तिची भूमिका कशा पद्धतीने बदलली, याविषयी सांगितलं. त्याचसोबत गरोदर असल्याचं जाहीर करताच अनेक प्रोजेक्ट्समधून तिला काढून टाकण्यात आल्याचा खुलासासुद्धा नेहाने या मुलाखतीत केला. नेहाने अभिनेता अंगद बेदीशी (Angad Bedi) २०१८ मध्ये लग्न केलं. नेहा आणि अंगदला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्य आहेत. प्रेग्नंट असल्याचं जाहीर केल्यानंतर मला अनेक प्रोजेक्ट्सवर पाणी सोडावं लागलं, अशी खंत तिने व्यक्त केली. “जर मोठ्या पडद्यावर आपण जिममध्ये वर्कआऊट केलेली बॉडी दाखवू शकतो, तर मग बेबी बंप का नाही दाखवू शकत,” असा सवाल तिने केला.
गरोदरपणात होणारे शारीरिक बदल लक्षात घेता अनेक निर्मात्यांनी नेहाला भूमिका देण्यास नकार दिला. मात्र ‘अ थर्सडे’चे दिग्दर्शक बेहजाद खंबाटा यांनी नेहाच्या प्रेग्नंसीबद्दल समजल्यानंतर तिच्या भूमिकेत आणि चित्रपटाच्या कथेत काही बदल केले आणि नेहाला गरोदर पोलिसाची भूमिका देण्यात आली. नेहाने २०१८ मध्ये मुलीला जन्म दिला. गरोदरपणातील नऊ महिन्यांत शक्य होईल तोपर्यंत काम करण्याची नेहाची इच्छा होती. मात्र प्रेग्नंसीमुळे अनेकांनी प्रोजेक्ट्समधून काढून टाकल्याचं नेहाने सांगितलं. अशा परिस्थितीत पॉडकास्ट आणि इतर शोच्या माध्यमातून नेहा काम करत राहिली. ‘नो फिल्टर विथ नेहा’ हा तिचा पॉडकास्ट चांगलाच चर्चेत आला होता. कोणी काम देत नसेल तर आपणच नव्याने काम तयार करू, असा विचार करत हे पाऊल उचलल्याचं नेहाने सांगितलं.
‘अ थर्सडे’ची शूटिंग सुरू करताना नेहा पाच महिन्यांची गरोदर होती. “जर मी स्वत: उदाहरण सादर करू शकले नाही तर महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल फक्त बोलण्यात काही अर्थ नाही. सिनेमा हा समाजाचाच आरसा असतो. माझ्या चित्रपटात मी आठ महिने गरोदर महिलेची भूमिका साकारली आहे. मी उचललेल्या पावलामुळे जर कोणत्याही अभिनेत्याला, निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला चित्रपटात गरोदर महिलेला भूमिका देऊ वाटल्यास, याला मी एक नवीन सुरुवात समजेन,” असं ती म्हणाली.