मुंबई : मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे या अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहीत नाही. ती गोष्ट म्हणजे नेहा सहा गोंडस मुलांची आई आहे. ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॉक शोमध्ये नेहाने ही गोष्ट कबूलही केली आहे. आता नेहाची ही क्युट मुलं कोण आहेत आणि हे नेमकं काय प्रकरण आहे, याचं उत्तर प्रेक्षकांना येत्या शुक्रवारी म्हणजेच 17 मार्च रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर मिळणार आहे.
“मी सहा क्युट मुलांची आई आहे” असं या टॉक शोमध्ये बोलत नेहाने सर्वांनाच धक्का दिला. तिचा हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेहाची ही सहा मुलं कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र ही मुलं म्हणजे नेहाने दत्तक घेतलेली कुत्र्याची पिल्लं आहेत. यामागची कहाणी ती या टॉक शोमध्ये सांगणार आहे.
नेहाने शार्दूलसोबत नरिमन पॉईंट ते नायगाव चक्क हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. आता अशा प्रवासाचं नेमकं कारण काय, याचंही उत्तर तिने या टॉक शोमध्ये दिले आहे. या टॉकशोमध्ये तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मेननही हजेरी लावली आहे. यावेळी त्यानेही त्याच्या आयुष्यातील एक गुपित उघड केले. ‘गली बॉय’ चित्रपटातील सिद्धांत चतुर्वेदीने साकारलेल्या एमसी शेर या भूमिकेसाठी सिद्धार्थला विचारणा करण्यात आली होती. आता ती भूमिका त्याच्या हातून का गेली, याचा खुलासा सिद्धार्थने केला आहे. असं त्याच्यासोबत अनेकदा घडल्याचंही त्याने सांगितलं.
नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी सुंदर तितकीच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही भन्नाट आहे. ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॉक शोमध्ये याचा अनुभव प्रेक्षकांना येईलच. यावेळी या दोघांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या शेअर केल्या आहेत.
नेहाने जानेवारी 2020 मध्ये व्यावसायिक शार्दुल बयासशी लग्न केलं. ती बिग बॉसच्या बाराव्या सिझनमध्येही झळकली होती. नेहाने ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तर ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’ या डान्स रिॲलिटी शोच्या अंतिम फेरीतही तिने मजल मारली होती. टुरिंग टॉकिज, बाळकडू, नटसम्राट अशा चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.
मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही नेहा प्रसिद्ध आहे. 1996 मधील ‘हसरतें’ या हिंदी मालिकेत नेहाने बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘मे आय कम इन मॅडम?’ या विनोदी मालिकेतील तिची भूमिकाही गाजली होती. फॅमिली टाईम विथ कपिलमध्येही नेहा दिसली होती. प्यार कोई खेल नही, देवदास, दिल तो बच्चा है जी अशा बॉलिवूडपटांमध्येही ती झळकली होती.